पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण
ठाणे दि १५ – भारतीय स्वातंत्र्याचा ७१ वा वर्धापन दिन समारंभ आज ठाणे जिल्हाधिकारी प्रांगणात पार पडला. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर उपस्थित होते.
या समारंभास खासदार डॉ श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, रवींद्र फाटक, सुभाष भोईर, प्रताप सरनाईक, महापौर मीनाक्षी शिंदे, जिल्हाधिकारी यांच्या पत्नी सीमा नार्वेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव, उपाध्यक्ष सुभाष पवार, ठाणे मनपा आयुक्त संजीव जयस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार आदींची उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, नागरिक यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
गुणवंतांचा सन्मान
यानंतर नियोजन भवन सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून या जिल्ह्याचा गतिमान विकास करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. शहिदांचा योग्य तो सन्मान व्हावा असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथही दिली.
प्रारंभी शहीद कौस्तुभ राणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच राजेंद्र तुकाराम गुरव यांना जीवनरक्षा पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर २०१७ मध्ये नक्षलवाद्यांविरुध्द केलेल्या कारवाईबद्धल मीरा रोडचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कांबळे यांना महासंचालक सन्मान चिन्ह देण्यात आले.
त्याचप्रमाणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा शहरी आणि आयसीएसई, सीबीएसई, राष्ट्रीय प्रज्ञा शोध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
१३ कोटी वृक्ष लागवड महामोहीमेत १०० टक्के उद्दिष्ट्य पूर्ण केलेल्या ठाणे मनपा, नवी मुंबई मनपा, कल्याण डोंबिवली मनपा, मीरा भाईंदर मनपा, जिल्हा परिषद, कृषी विभाग, गृह विभाग, शिक्षण विभाग, बदलापूर नगर परिषद, अंबरनाथ नगर परिषद, मुरबाड नगर पंचायत, यांचा देखील गौरव करण्यात आला.
२१ वयोगटातील मतदारांना प्रातिनिधिक स्वरूपात मतदार ओळखपत्र देण्यात आली. ब्रह्मकुमारी तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, पर्यावरण दक्षता मंडळाच्या प्रतिनिधींचा देखील यावेळी गौरव करण्यात आला.