केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य, दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी राज्यातील आदर्श आचारसंहिता शिथिल
`दुष्काळ निवारणाची कामे करण्यास आपली हरकत नसल्याचे आयोगाने कळविल्याने दुष्काळ निवारणासंदर्भात मंत्रिमंडळ सदस्यांना दौरे काढता येणार आहेत. तसेच मतमोजणी प्रक्रियेत समावेश असलेल्या मनुष्यबळाव्यतिरिक्त इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना मंत्री महोदयांच्या दौऱ्यात सहभागी होता येणार आहे. त्याचप्रमाणे आढावा बैठका घेऊन उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनास आदेशित करता येणार आहे.
दुष्काळ निवारणासंदर्भातील पायाभूत सुविधांच्या कामांना आता गती देता येणार असून पाणी टंचाईच्या ठिकाणी कुपनलिकांची निर्मिती, पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, कालव्यांची देखभाल दुरुस्ती ही कामे तातडीने पूर्ण करणे शक्य होणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील कामांच्या निविदा नव्याने मागविण्यासह निविदांचे मूल्यांकन, निविदा अंतिम करणे तसेच निविदांसंदर्भातील इतर सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार आहेत. विविध विभागांच्या वार्षिक आराखड्यानुसार करार करणे आणि संबंधित कामेही करता येणार आहेत. त्यामध्ये रुग्णालयांच्या पायाभूत सुविधा, रस्त्यांची कामे, नगरपालिका आणि पंचायतींची कामे इत्यादी कामांचा समावेश आहे.