मुंबई महापालिका हेच लक्ष्य, अंधेरी पोटनिवडणुकीकडे दुर्लक्ष – शेखर जोशी
मुंबई दि.१७ :- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ठरवून’ केलेला डाव होता. शिंदे आणि फडणवीस यांचे खरे ‘लक्ष्य’ बृहन्मुंबई महापालिका निवडणूक हे असल्यामुळे त्यांनी आत्ता एक पाऊल मागे घेतले. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नावही तात्पुरता स्वरूपात का होईना गमवावे लागले.
हेही वाचा :- महामुलाखतीचा महाफुसका बार – शेखर जोशी
एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर तिथे होणा-या पोटनिवडणुकीत त्याच्या निकटवर्तीय व्यक्तीलाच (पत्नी, पती, मुलगा, मुलगी) उमेदवारी दिली जाते. बहुतेक सर्वच राजकीय पक्षांकडून हा निर्णय घेण्यात येतो. सहानुभूती मिळविणे हा ही त्यामागील एक उद्देश असतो आणि अशावेळी अन्य राजकीय पक्षांकडून त्याठिकाणी विरोधात उमेदवार उभा केला जात नाही आणि ती निवडणूक बिनविरोध पार पडते. मात्र असे असतानाही अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने आपला उमेदवार उभा केला. त्यावरूनही उलटसुलट चर्चा झाली. या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट) पक्षाने आपला उमेदवार दिला नव्हता. खरी शिवसेना कोणाची? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी खरे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील व्यक्तीला इथे उमेदवारी मिळायला हवी होती. मात्र त्यांच्याकडे योग्य उमेदवार नसल्यामुळे इथे भाजपचा उमेदवार उभा करण्याचे ठरविले गेले.
हेही वाचा :- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून इथे निवडणूक लढवली जाणार नव्हती तर ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला मिळावे, यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी का प्रयत्न केले? असा प्रश्न अनेकांना पडला. ठाकरे यांच्या शिवसेनेकडूनही तसे विचारले गेले. भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरूनच शिंदे ही खेळी खेळत असल्याचे बोलले गेले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाकडून आमचीच शिवसेना खरी असा दावा करुन धनुष्यबाण हे चिन्ह आमच्याच गटाला मिळावे, अशी मागणी करण्यात आली. इथे मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपने एकाच दगडात दोन पक्षी मारले. यातून तात्पुरते का होईना शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठविले गेलेच पण त्याबरोबरच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत किंवा त्यापुढे होणाऱ्या निवडणुकीत (या बाबतचा अंतिम निर्णय लागत नाही तोपर्यंत) ना उद्धव ठाकरे यांना ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. तो निर्णय भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या पथ्यावरच पडला.
हेही वाचा :- शिवसेनेच्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रेच’ – शेखर जोशी
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आपल्या उमेदवाराला सहानुभूतीच्या लाटेत निवडणूक जिंकणे कठीण जाईल याची जाणीव आधीच भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना होती. पण या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबद्दल प्रश्न उपस्थित केला आणि महापालिका निवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येऊ नये, याची तरतूद केली. त्यावर शिवसेना नावही वापरता येणार नाही हा बोनसही मिळाला.
हेही वाचा :- काही बोलायचे आहे पण आत्ता बोलणार नाही – राज ठाकरे यांच्या ‘ट्विट’मुळे विविध तर्क- वितर्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाचा उमेदवार अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत उभा नव्हताच. उमेदवार भाजपने उभा केला होता. त्यामुळे या निवडणुकीत दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके विजयी झाल्या असत्या तरी शिंदे गटाचे कोणतेही नुकसान झाले नसते. सहानुभूतीच्या लाटेवर ऋतुजा लटके या निवडून येऊ शकतात आणि इथे आपल्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो याची पक्की खात्री भाजपच्या नेत्यांना होतीच. पण तरीही उमेदवार उभा करण्याचे ‘नाटक’ केले गेले. त्यानंतर ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांचा या नाटकात प्रवेश झाला. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भाजपने या निवडणुकीतून माघार घ्यावी असे सुचविले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. भाजपने आपल्या उमेदवाराचे नाव मागे घेणे हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला आणि परंपरेला धरून होईल असेही राज ठाकरे म्हणाले. त्यावर फडणवीस यांनी आधी ठरविल्याप्रमाणे आमच्या पक्षात मी एकटा निर्णय घेत नाही. याविषयी आमच्या वरिष्ठांची बोलावे लागेल असे सांगितले. आणि सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजप माघार घेत असल्याची घोषणा केली.
हेही वाचा :- निवडणूक चिन्हांचा रंजक प्रवास – शेखर जोशी
या निवडणुकीत ऋतुजा लटके पराभूत झाल्या असत्या आणि भाजपचा उमेदवार जिंकून आला असता तरी मतदारांच्या मनात लटके यांच्या विषयी सहानुभूती निर्माण झाली असती. एखाद्या राजकीय पक्षाशी निष्ठावंत असलेले मतदार त्या राजकीय पक्षाच्या उमेदवारालाच मत देतात. पण जे काठावरचे मतदार असतात ते मात्र त्या त्या वेळची परिस्थिती पाहून आपले मत कोणाच्या पारड्यात टाकायचे ते ठरवित असतात. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अगदी पंचवीस/पन्नास अशा थोड्याफार मतांच्या फरकानेही एखादा उमेदवार विजयी किंवा पराभूत होतो. त्यामुळे तिथे या काठावरील मतदारांच्या मताला खूप महत्त्व येते. ते निर्णायक ठरते. त्यामुळे लटके पराभूत झाल्या असत्या तर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाला त्याचा फटका बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीत बसला असता. किंवा ऋतुजा लटके निवडून आल्या असत्या तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ती आत्मविश्वास वाढविणारी गोष्ट ठरली असती. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने आता माघार घेतल्यामुळे तो लाभ उद्धव ठाकरे शिवसेनेला मिळणार नाही. ही निवडणूक केवळ औपचारिकता ठरणार आहे.
हेही वाचा :- भाषण नव्हे वाचन – शेखर जोशी
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके या उद्धव ठाकरे शिवसेनेच्या ‘डमी’ उमेदवार होत्या असेही बोलले जाते. लटके यांच्या राजीनामा पत्राचा घोळ घालून त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्याची खेळी खेळली जाणार होती. (अर्ज सादर करतानाच लटके यांच्यासह अन्य एक/दोन ‘वजनदार’ उमेदवारांनीही अर्ज दाखल केले होते असे म्हणतात) त्यामुळे तो ही डाव उधळला गेला असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा :- शिल्लक सेनेचा रडगाणे मेळावा – शेखर जोशी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खरे लक्ष्य बृहन्मुंबई महापालिका निवडणूक आहे. गेली अनेक वर्षे शिवसेना महापालिकेत सत्तेवर आहे. ही सत्ता शिवसेनेसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून हीच सोन्याचे अंडे देणारी कोंबडी हिसकावून घ्यायची आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेणे म्हणजे बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पराभूत करण्याच्या लक्ष्याचा पहिला अंक पार पडला, असे म्हणता येईल.