नवघर, कुंडेगाव, जसखार ही गावे टाकणार मतदानावर बहिष्कार.

नागरी समस्याकडे दुर्लक्ष झाल्याचा नागरिक, ग्रामस्थांचा आरोप.
वेळेत समस्या सुटत नसल्याने बहिष्काराचा निर्णय.
बहिष्कारासाठी सर्वपक्षीय मीटिंगचे आयोजन.

उरण दि.२७ – एप्रिल महिन्यात मावळ लोकसभा मतदार संघात खासदार पदासाठी निवडणूका होणार आहेत.त्या अनुषंगाने सर्व तयारी सुरुही झाल्या आहेत. मात्र या निवडणूकांमुळे उरण मधील विविध नागरी समस्या चर्चेत येउ लागले आहेत. त्यातच उरण तालुक्यात अनेक वर्षापासून विविध समस्या पैकी एक समस्या येथील स्थानिक जनतेला खूप मोठ्या प्रमाणात सतावत आहे आणि ती म्हणजे समुद्राचे भरतीचे पाणी, खाडीचे पाणी गावात घुसणे. उरण मध्ये विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी मातीच्या भरावाचे काम सुरु आहे. या मातीच्या भरावामुळे गावातील पाण्याचा योग्य तो निचरा होत नाही. उलट समुद्राच्या भरतीमुळे समुद्राचे,खाडिचे पाणी प्रचंड प्रमाणात गावात घराघरात घुसत आहे. नवघर, कुंडेगाव मध्ये असे पाणी वारंवार शिरत आहे यामुळे घरातील लोखंडी अवजारे, सामान,स्टीलच्या भांडी, लाकडी फर्नीचर, इलेक्ट्रॉनिक वस्तु खराब झाले असून यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे आणि होत आहे. या पाण्यामुळे गावात विविध रोगराई सुद्धा पसरत आहे.

यामुळे नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थांनी उरणचे विद्यमान आमदार मनोहर भोईर,सिडको प्रशासन यांच्या निदर्शनास आणून दिली होती मात्र लोकप्रतिनिधि व सिडको प्रशासनाने या गंभीर समस्याकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याने समुद्राचे पाणी घरात घुसत असल्याचे मत येथील नागरीकांनी व्यक्त केले.वेळोवेळी होणाऱ्या समुद्राच्या भरती मुळे येथील नागरीकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नवघर गावामध्येही विविध समस्या प्रलंबित आहेत.त्या समस्या वर्षानुवर्षे सुटत नसल्याने नवघर, कुंडेगाव मधील ग्रामस्थांनी लोकसभेच्या निवडणूकीवर बहिष्कार टाकन्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. सर्वच राजकीय पक्षांची याबाबत 2 ते 3 दिवसात मीटिंगचे आयोजन करण्यात आले असून सर्वपक्षीय तर्फे मतदानावर जाहिर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी दिली. पंचायत समिती सदस्य दीपक ठाकुर, नवघरचे सरपंच आरती चोगले, पागोटेचे सरपंच भार्गव पाटिल, शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका चिटनीस मेघनाथ तांडेल यांनीही समस्या वेळेत सुटनार नसल्यास लोकसभेच्या मतदानावर जाहीरपने बहिष्कार टाकन्याचा इशारा दिला आहे.

तर दूसरीकडे जसखार गावातही लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने 3 ते 4 दिवसात लवकरच एका मीटिंगचेही आयोजन करण्यात आले आहे. जसखार गावातुन एक नवीन रस्ता बनविला जात आहे या रस्त्यामुळे गावचे अस्तित्व व संपूर्ण उरणकरांचे श्रद्धास्थान असलेले रत्नेश्वरी मंदिराचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. तसेच जसखार गावातील विजेच्या तारेमुळे गंभीररित्या जखमी झालेल्या जसखार गावातील रहीवाशी यश बाळू शेळके याला आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, दोषी व्यक्तिवर गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी जसखार ग्रामस्थांनी केली होती.मात्र या मागणीकडे लोक प्रतिनिधिसह सर्वांनीच या बाबीकडे जाणून बुजुन दुर्लक्ष केले आहे. शिवाय जसखार गावच्या वेगवेगळ्या समस्याही प्रलंबित आहेत.जसखार गावचे सरपंच दामोदर(दामुशेठ) घरत व ग्रामपंचायत सदस्य यांनीही शासनाच्या विविध विभागात यशला न्याय मिळावे म्हणून पत्रव्यवहार केला तरि मात्र त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने जसखार ग्रामस्थांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकन्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. याबाबत पुढील रणनिती ठरविन्यासाठी वेळोवेळी बैठकाही घेण्यात येणार असल्याची माहिती समजते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email