‘महावितरण’च्या कंत्राटी कामगारांचे लाक्षणिक उपोषण

पुणे दि.१० :- ‘महावितरण’ मधील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांतर्फे (संलग्न भारतीय मजदूर संघ) महावितरण कंपनीच्या पुणे येथील प्रादेशिक संचालक कार्यालयसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. संघटनेचे उपसरचिटणीस राहुल बोडके, सातारा येथील पीडित कामगार व अन्य पदाधिकारी उपोषणास बसले होते. वीज मंडळ शिकाऊ उमेदवार संस्था सातारा या कंत्राटदाराला महावितरण चे सातारा जिल्ह्यातील कंत्राट मिळाले होते. त्यांनी अनेक वीज कंत्राटी कामगारांच्या पगारातून दरमहा ११०० रुपये अनधिकृतपणे विम्याच्या नावाखाली कापून घेतले.

कशेडी घाटातील मुंबई गोवा महामार्गावरील बोगद्यातून एकेरी वाहतूक सुरू होणार- बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

सहा कामगारांनी ही बाब महावितरण सातारा प्रशासन व सातारा पोलीस यांच्या निदर्शनास आणून दिली असता या संस्थेवर सातारा पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल होऊन सदर कंत्राटदाराला अटक झाली. मात्र तक्रार केली या सूडभावनेने या कंत्राटदाराने १ जानेवारी २०२३ पासून या सहा वीज कंत्राटी कामगारांना कामावर रुजू करून घेतले नाही. कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतही महावितरण सातारा प्रशासनाने पुन्हा त्यालाच निविदा दिली. याबाबत संघटनेने प्रशासन व मा.सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सातारा येथेही तक्रार केली आहे. सहाय्यक कामगार आयुक्त सातारा व अधीक्षक अभियंता सातारा यांनी आदेश देऊनही या सहा कंत्राटी कामगारांना कामावर घेण्यात आलेले नाही. त्याच्या निषेधार्थ हे उपोषण करण्यात आले.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या निकाल – सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

कामगार उपायुक्त अभय गीते यांनी या विषयावर वरिष्ठ पातळीवर त्रिपक्षीय बैठक घेवून कामगारांना न्याय दिला जाईल तसेच दोषी संस्थेवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाने तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांतर्फे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये उपोषण करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात,सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी यावेळी झालेल्या जाहीर सभेत दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.