स्वातंत्र्यवीर सावरकर हे खरे पुरोगामी, धर्मनिरपेक्ष – अतुल भातखळकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण सोहळा

स्वातंत्र्यवीर सावरकर हे खरे पुरोगामी, धर्मनिरपेक्ष – अतुल भातखळकर

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे खरे पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष होते. त्यांनी केवळ हिंदुंच्या अयोग्य रुढींवरच नव्हे तर मुस्लीम- ख्रिश्चन या धर्माचा अभ्यास करून त्यांच्या कुप्रथांवरही प्रहार केले. ते श्रेष्ठ मानवतावादी होते.  ज्या काळात देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असा ठराव करणेही अवघड होते, त्यावेळी वीर सावरकरांनी अगदी बालवयात ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय’ अशा घोषणा दिल्या आणि या देशाच्या स्वातंत्र्याचा उद्घोष केला.

क्रांतिकार्याद्वारे त्यांनी भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ही जागतिक पातळीपर्यंत नेली असे उद््गार भारतीय जनता  पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी रविवार, दि. २२ मे २०२२ या दिवशी बोलताना काढले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार, तसेच शिखर सावरकर पुरस्कार २०२१ चे वितरण करण्यात आले.  सुरुवातीला स्मारकाच्या कला प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी सावरकर  गीत सादर केले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भातखळकर बोलत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जातीनिर्मूलनाचे काम महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे जेव्हा रत्नागिरीला गेले ते त्यांनी पाहिले आणि त्यांनी ते काम पाहून उत्स्फूर्तपणे सांगितले की,  मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो, माझे उरलेले आयुष्य सावरकरांना द्यावे. कारण माझ्या आयुष्यात मी जे करू शकलो नाही ते वीर सावरकरांनी पाच-सात वर्षांत रत्नागिरीमध्ये केले, असेही भातखळकर म्हणाले.

त्यांनी सांगितले की, सध्या वीर सावरकर यांच्या विचारसरणीवर संपूर्ण देश चालत आहे,  देशाच्या सुरक्षेविषयी धोरणात्मक दृष्टिकोन वीर सावरकर यांच्याकडे होता. जगात काय घडू शकते, माझ्या देशाचे हित कशात आहे. याची जाणीव फक्त वीर सावरकर यांना होती. हे सांगताना त्यांनी  सावरकर यांच्या संबंधातील घटना सांगितली.

सावरकरांना अंदमान येथे जेव्हा कारावासात नेण्यासाठी घेऊन गेले, तेव्हा तेथील भौगोलिक स्थिती पाहून सावरकर यांनी त्यावेळी सांगितले की, हा माझ्या देशाच्या सुरक्षेसाठीचा पूर्वेचा दुर्गच होईल. भारतीय हवाईदलात लढावू विमानाचे वैमानिक म्हणून मोठा अनुभव असणारे ग्रुप कॅप्टन आणि मुंबई एन. सी. सी. चे प्रमुख (ग्रुप कमांडर) नीलेश देखणे हे ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

त्यानी आपल्या भाषणात लष्करी प्रशिक्षणाचे महत्त्व सांगत शिस्तीसाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज आहे. नवीन पिढीला हुतात्म्यांची आठवण करून देण्यासाठीही काम करणार असल्याचे स्पष्ट केले. आपल्या वडिलांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आपण आपल्या मुलाला लष्करात दाखल करू असा शब्द दिला आणि तो पाळला असेही त्यांनी यावेळी अभिमानाने आणि भावूक होऊन सांगितले.

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले की, वीर सावरकर यांचे लिखाण अत्यंत उत्कृष्ट आणि दर्जेदार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आपण जेवढे वाचाल तेवढी आपली स्फूर्ती आणि प्रेरणा वाढत जाते. वीर सावरकर यांनी इतिहासावर केलेले लिखाण असो किंवा त्यांनी लिहिलेले काव्य, गद्य, नाट्य असो या सर्व साहित्याचा एकच गाभा होता, तो म्हणजे राष्ट्रनिष्ठा.

दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरही वीर सावरकर हे  विचारांची जी असहिष्णुता म्हणतात, त्या विचारांना बळी पडले होते. विशेष म्हणजे वीर सावरकर यांनी आधीच स्पष्ट केले होते की, मला निवडणूक लढवायची नाही. मला पंतप्रधान, राष्ट्रपती व्हायचे नाही. मी कुठल्याही स्पर्धेत नाही, तरीही वीर सावरकर यांचे विचार दाहक आहेत, राष्ट्रप्रेमाचे होते म्हणून त्यांच्यावर अत्याचार केले जात होते, असे दीक्षित यांनी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यावेळी आपल्या भाषणात म्हणाले की, वीर सावरकर यांनी राष्ट्रविषयक जे जे विचार मांडले, त्याचे विस्मरण झाले म्हणून त्याचे गंभीर परिणाम आपण स्वातंत्र्यानंतर आजही भोगत आहोत. काश्मीरमधील बराचसा भूभाग आपण गमावला, हजारो जवानांचे प्राण गमावले. १९४८ मध्ये आपल्याला नुकसान सहन करावे लागले.

१९६१चे चीनसोबतचे युद्ध आपण हरलो, १९७१च्या लढाईला सामोरे जावे लागले, हे सगळे आपण विसरत गेलो, असे सांगत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर म्हणाले की, २०१४ साली देशात जे सरकार आले ते वीर सावरकर यांच्या विचारांवर चालत आहे, त्यामुळे आता बदल घडताना दिसत आहेत.

वीर सावरकर यांनी मांडलेले विचार जे आपण विसरत चाललो आहोत, ते वारंवार स्मरणात आणून देण्याचे कार्य सावरकर स्मारक करत आहे. वीर सावरकर कायम म्हणायचे की, देशाची सीमा कागदावर नाही, तर बंदुकीच्या टोकाने जमिनीवर रेखाटली जाते, हे विचार आपण विसरलो, म्हणून स्वातंत्र्यानंतर आपण हजारो जवानांचे प्राण गमावले, असेही रणजित सावरकर यांनी सांगितले.

पुरस्कार वितरण 

पुरस्कार वितरणामध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ सुभेदार संतोष राळे यांना प्रदान करण्यात आला. एक लाख एक हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. संरक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे अतुल राणे यांचा ‘विज्ञान पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. एकावन्न हजार रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. वीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या वडोदरा येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक केंद्रा’ला स्मृतीचिन्ह पुरस्कार देण्यात आला. पंचवीस हजार रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

शिखर सावरकर पुरस्कार २०२१

त्याचप्रमाणे शिखर सावरकर मालिकेतील २०२१ च्या तीन पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. यामध्ये गिर्यारोहण क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणारे सुशांत अणवेकर यांना ‘शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार २०२१’ प्रदान करण्यात आला. तर रत्नागिरी येथील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स संस्थेचा ‘शिखर सावरकर दुर्ग संवर्धन’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

संरक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे अतुल राणे यांचा ‘विज्ञान पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला त्यावेळी डावीकडून सावरकर स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, प्रमुख पाहुणे आणि भाजप आमदार अतुल भातखळकर, स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, प्रमुख पाहुणे नीलेश देखणे, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर.

शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कार हा एव्हरेस्ट वीर पद्मश्री सोनम वांग्याल यांना जाहीर झाला आहे. मात्र ते वृद्धापकाळाने इतक्या लांबवल येऊ शकले नाहीत, त्यांच्यावतीने श्री. राजू पाटील यांनी पुरस्कार, मानचिन्ह स्वीकारले. कोविडमुळे या पुरस्काराचे वितरण विलंबाने या समारंभात केले गेले.

सावरकर क्रीडा प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये तायक्वांडोचे प्रशिक्षक राजेश खिलारी, तनवीर राजे, मौर्यांश मेहता, इशा शाह, रायफल शुटिंगचे रुचिता विनेरकर, रायफल शुटिंग प्रशिक्षक विश्वजीत शिंदे, ‘अनादी मी अनंत मी’ या गीतावर नृत्य करणारे गुरुराज कोरगावकर यांचा सत्कार करण्यात आला.

वीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या वडोदरा येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक केंद्रा’ला स्मृतीचिन्ह पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना केंद्राचे अनिल कानिटकर. त्यावेळी डावीकडून सावरकर स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, प्रमुख पाहुणे आणि भाजप आमदार अतुल भातखळकर, स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, प्रमुख पाहुणे नीलेश देखणे, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर.

यावेळी शौर्य पुरस्कार विजेते सुभेदार संतोष राळे यांनी  काश्मिरमध्ये घुसखोरी करणाऱ्या सशस्त्र अशा १८ दहशतवाद्यांना कसे ठार केले, त्याची रोमांचकारी माहिती दिली. तर विज्ञान पुरस्कार विजेते अतुल राणे, तसेच वडोदरा येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक केंद्राच्यावतीने श्री. अनिल कानिटकर यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  करुणाशंकर तिवारी आणि हेमा निकम यांनी केले. वंदे मातरमने समारंभाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.