जमिनीचे आरोग्य आणि सुपीकपणा यात सुधारणा करून सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पादन शक्य-राधा मोहन सिंह
नवी दिल्ली, दि.०८ – शेतकऱ्यांना उपजिविका पुरवणे आणि ग्रामीण तसेच शहरी भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची क्षमता सेंद्रीय शेतीमध्ये आहे असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंह यांनी म्हटले आहे. मथुरा येथे आयोजित सेंद्रीय शेती परिषदेला ते काल संबोधित करत होते. जमिनीचे आरोग्य आणि सुपीकपणा यात सुधारणा करून सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पादन साध्य करता येईल असे ते म्हणाले. 2015-16 ते 2018-19 या काळात देशात समूह पद्धतीने सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 1307 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे ते म्हणाले. परंपरागत कृषी विकास योजना, सेंद्रीय मूल्य साखळी विकास अभियान आणि एपीईडीएच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे देशात आतापर्यंत 23.02 लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन प्रमाणित सेंद्रीय शेती अंतर्गत आणण्यात आल्याचे ते म्हणाले.
जागतिक बाजारपेठेत भारतीय सेंद्रीय उत्पादनांना मोठी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. रासायनिक खते आणि किटकनाशकांवर अधिक अवलंबून न राहता केंद्रीय शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले.