जागतिक व्यापार वाढीसाठी सेवांवर भर देण्याचे सुरेश प्रभू यांचे जी-20 सदस्यांना आवाहन
नवी दिल्ली, दि.१९ – अर्जेंटिनातील मार डेल प्लाटा येथे 14 सप्टेंबर 2018 रोजी झालेल्या जी-20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. या बैठकीला जी-20 समूहाचे, आठ अतिथी देशांचे मंत्री आणि डब्ल्यूटीओ, आयटीसी, ओईसीडी, जागतिक बँक, आयएमएफ, सीएएफ आणि आयएडीबी यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख/उपप्रमुख उपस्थित होते.
यंदाच्या जी-20 चे अध्यक्षपद अर्जेंटिनाकडे असल्यामुळे अर्जेंटिनाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉर्ज फौरी आणि उत्पादन व श्रम मंत्री डान्टे सिका यांनी संयुक्तपणे या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. समान आणि शाश्वत विकासासाठी सहमती निर्माण करणे हा यंदाचा उद्देश आहे. या बैठकीत बोलतांना सुरेश प्रभू यांनी जागतिक व्यापार वाढवण्यासाठी सेवांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन जी-20 सदस्यांना केले.