भिवंडीच्या गोदामातुन ७४ लाखांचा कालबाह्य कीटकनाशकांचा साठा जप्त

 

भिवंडीतील गोदामातून पेस्ट कंट्रोलसाठी वापरण्यात येणारा कालबाह्य कीटकनाशकांचा ७४ लाखांचा अवैध साठा, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण कक्षाने छापा टाकून जप्त केला.

याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात साठवणूक करणाऱ्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे. शरद रोहिदास नलावडे (रा. चक्कीनाका, कल्याण पूर्व ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

कृषी विभागाचे जिल्हाअधिक्षक विजय अर्जुन तुपसौंदर्य यांना भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू टावरे कंपाऊंडमधील एका गोदामामध्ये पेस्ट कंट्रोल ऑफ इंडिया या कंपनीचा कालबाह्य कीटकनाशक साठा साठवुन, त्याची विक्री होत असल्याची माहिती खबऱ्या मार्फत मिळाली होती.

त्या माहितीच्या आधारे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास न्यू टावरे कंपाऊंडमधील गोदामावर छापेमारी केली. या छापेमारीत तब्बल २६ हजार ८८० किलो वजनाचा म्हणजेच ७४ लाख १९ हजार रुपये किंमतीचा अवैध कालबाह्य साठा मिळाला. त्यानंतर पंचनामा करत कालबाह्य कीटकनाशक साठा जप्त केल्या गेला.

विशेष म्हणजे गुन्हा दाखल केलेला आरोपी हा कपडा दलाल असल्याचे समोर आले. त्याच्यावर शासनाची व ग्राहकांची फसवणूक केल्या प्रकरणी शनिवारला भादंवि कलम ४२० सह विविध कीटकनाशके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागल्याने तो फरार झाला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि धनराज केदार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.