मुंब्य्रात तीन दिवसांपासून सोनारांचा बंद
ठाणे – मुंब्रा येथील तीन सोनारांना बंगळुरु पोलिसांनी अटक करुन नेले आहे. मात्र, सद्यस्थितीमध्ये त्यांचा कोणत्याही प्रकारे तपास लागत नसल्याने मुंब्रा- कौसा ज्वेलर्स असोशिएशनने सलग तीन दिवस बंद पुकारला आहे. दरम्यान, या सोनारांचा शोध घेण्यासाठी ज्वेलर्स असोशिएशन गुरुवारी (दि.20) ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. मुंब्रा येथील नवकार ज्वेलर्स आणि मीरा ज्वेलर्सचे मालक नेमीचंद, दीपककुमार आणि यवराज कुमार यांच्या दुकानांवर शनिवारी सायंकाळच्या सुमारास बंगळुरु पोलिसांनी अचानक छापा मारला. या सोनारांनी चोरीचे सोने घेतले असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. मात्र, या पोलिसांनी ओळख परेड न घेता या तिघांनाही आपल्या ताब्यात घेतले. यावेळी मुंब्रा- कौसा ज्वेलर्स असोशिएनच्या पदाधिकार्यांनी सदर बंगळुरु पोलिसांना विचारणा केली असता ठाणे गुन्हे शाखेत या, असे सांगण्यात आले.
हेही वाचा :- कल्याण ; खासगीकरणाविरुद्ध कडोंमपातील कर्मचारी कामगार सेना आक्रमक
पदाधिकारी तिथे गेले असता संबधित पोलीस मुंब्रा पोलीस ठाण्यात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मुंब्रा येथे पदाधिकारी परतले असता सदर सोनारांवर भादंवि 392 अन्वये गुन्हा दाखल केला असल्याची नोंद करुन त्यांना बंगळुरु येथे घेऊन गेले असल्याचे सांगण्यात आले. या तिघांच्या सुटकेसाठी त्यांचे नातेवाईक बंगळुरु येथे गेले असता त्यांच्याकडून सुमारे 6 किलो सोन्याची मागणी करण्यात आली असल्याचा आरोप मुंब्रा कौसा ज्वेलर्स असोाशिएशनचे गौतमचंद जैन आणि अल्पेश जैन यांनी केला. दरम्यान, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सुमारे 70 सोनारांनी सोमवारपासून आपली दुकाने बंद ठेवली आहेत. संपकरी सोनारांची राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा- मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान आणि ज्येष्ठ नगरसेवक शानू पठाण यांनी भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भात हे सोनार गुरुवारी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेणार आहे.