तो मी नव्हेच’ ला साठ वर्षे पूर्ण – रवींद्र नाट्य मंदिरात आज विशेष कार्यक्रम

 

मुंबई- आचार्य अत्रे लिखित आणि दिवंगत ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांनी अभिनय केलेल्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकाला आज ( ८ ऑक्टोबर २०२२) साठ वर्षे पूर्ण होत आहेत. आज साठ वर्षानंतरही जनमानसावरील या नाटकाची मोहिनी अद्यापही कायम आहे.

८ ऑक्टोबर १९६२ या दिवशी दिल्लीतील ‘आयफॅक्स’ नाट्यगृहात ‘तो मी नव्हेच’ नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला होता. या नाटकामध्ये लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, कॅ. अशोक परांजपे, दाजीशास्त्री दातार आणि राधेश्याम महाराज अशा पाच भूमिका पणशीकर यांनी आपल्या अभिनयाने अजरामर केल्या. फिरता रंगमंच हे या नाटकाचे वैशिष्ठ्य होते.

एकाच कलाकाराने रंगमंचावर पाच वेगवेगळ्या भूमिका साकारणे हे त्या काळी जागतिक रंगभूमीवरही आश्चर्य ठरले होते.
मो. ग. रांगणेकर यांच्या ‘नाट्यनिकेतन’ संस्थेतर्फे ‘तो मी नव्हेच’ नाटक रंगभूमीवर आले. त्यानंतर अत्रे थिएटर्स संस्थेने नाटकाची निर्मिती केली. पुढे प्रभाकर पणशीकर यांच्या ‘नाट्यसंपदा’ संस्थेने ‘तो मी नव्हेच’ नाटकाचे दीर्घकाळ प्रयोग केले.

तीन हजारांहून अधिक प्रयोगांमध्ये पंचरंगी भूमिका साकारणाऱ्या पणशीकर यांना या नाटकाने नावलौकिक प्राप्त करून दिला. या नाटकाच्या गुजराती आणि कन्नड भाषेतील प्रयोगांमध्येही प्रभाकर पणशीकर यांनीच या पंचरंगी भूमिका साकारल्या होत्या. पणशीकर यांनी या नाटकाचे २ हजार आठशेहन अधिक प्रयोग केले.

पुढे पुढे नाटकातील इतर नटसंच बदलला मात्र पहिल्या प्रयोगापासून ते २००८ पर्यंत प्रभाकर पणशीकर यांनीच नाटकातील ‘पंचरंगी’ भूमिका साकारली. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या नाटकाने अक्षरशः इतिहास घडविला. कोल्हापूर येथील सादबा मिस्त्री यांनी नाटकासाठी फिरता रंगमंच तयार केला होता.

पणशीकर यांनी लोकप्रिय केलेल्या ‘तो मी नव्हेच’च्या नव्या संचात अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी लखोबा लोखंडेसह पाचही भूमिका साकारल्या. त्यांनी या नाटकाचे काही प्रयोग सादर केले.

प्रभाकर पणशीकर यांनी अजरामर केलेला ‘लखोबा लोखंडे’

राज्य शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि नाट्यसंपदा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तो मी नव्हेच’ च्या हिरक महोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने ८ ऑक्टोबर, २०२२ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘तो मी नव्हेच’ नाटकातील काही महत्त्वाचे प्रवेश यावेळी सादर होणार आहेत.
प्रभाकर पणशीकर यांच्या काही दुर्मिळ चित्रफितीही दाखविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना नाट्यसंपदा प्रतिष्ठान संस्थेच्या जान्हवी सिंह, तरंगिणी खोत यांची आहे. कार्यक्रमाचे निवेदन आणि दृकश्राव्य सादरीकरण नरेंद्र बेडेकर करणार आहेत. अभिनेते डॉ. गिरीश ओक नाटकातील ‘लखोबा लोखंडे’ सादर करणार आहेत.

     तो मी नव्हेच ह्या नाटकातील एक प्रसंग

विशाखा सुभेदार, सागर कारंडे, प्रभाकर मोरे, विघ्नेश जोशी, दिनेश कोडे, गोट्या (प्रभाकर) सावंत, पं. रघुनन्दन पणशीकर यांचा या कार्यक्रमात विशेष सहभाग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.