डोंबिवली ; अवाजवी फीविरोधात ‘सिस्टर निवेदिता’वर धडक, पालकांना शाळेच्या प्रवेशद्वारावर रोखले
डोंबिवली दि.१३ :- डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिस्टर निवेदिता शाळेत इयत्ता पहिलीसाठी वर्षाला ३८ हजार रुपये प्रवेश फी आहे. ही अवाजवी फी कमी करण्यासाठी सोमवारी काही पालकांनी या शाळेवर धडक दिली. यावेळी एका विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आणि पालकांना आत येण्यास मज्जाव केला. त्यामुळे जबरदस्तीने शाळेत घुसण्याचा प्रयत्न करणारे पालक, संघटनेचे पदाधिकारी आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमक घडल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. एमआयडीसी निवासी भागात असलेली सिस्टर निवेदिता शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्यात काही दिवसांपासून फीवरून संघर्ष सुरू आहे. पहिलीसाठी प्रवेश फी जास्त असल्याचा पालकांनी आक्षेप घेतल्यानंतर संस्थाचालकांनी ३८ हजारांवरून ती ३२ हजारांपर्यंत कमी केली.
हेही वाचा :- स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रदूषण मंडळाची नोटीस, सांडपाणी प्रक्रियेत दिरंगाई
मात्र, ही फी २७ हजारांपर्यंत कमी करण्याची पालकांची मागणी असून संस्थाचालकांनी त्यास नकार दिला आहे. फी ठरवण्याचा अधिकार संस्थेचा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शाळेच्या संस्थाचालकांना भेटण्यासाठी पालकांच्या प्रतिनिधींना परवानगी देण्यात आली; मात्र विद्यार्थी नेत्याला प्रवेश नाकारल्याने पालक संतापले. त्यामुळे त्यांनी जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता प्रवेशाद्वारावर बाचाबाची झाली. दरम्यान, यावेळी संस्थाचालकांनी काही पालकांशी चर्चा केली, मात्र अखेरपर्यंत विद्यार्थी संघटनेच्या नेत्याला प्रवेश देण्यात आला नाही. संस्थेने जाहीर केलेल्या फीमध्ये बदल होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सिस्टर निवेदिता शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षू बेल्लारे म्हणाल्या की, इयत्ता पहिलीची फी ठरवण्याचा अधिकार शाळेच्या व्यवस्थापनाचा आहे. इयत्ता पहिली सोडून इतर इयत्तांची फी वाढवण्याचा अधिकार नियमानुसार असतो. इतर इयत्तांची फीवाढ पॅरेंट-टीचर असोसिएशन (पीटीए) सदस्यांच्या समितीकडून ठरवली जाते. यासंदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाकडे लक्ष वेधले.