बहिण -भावाचा गळा चिरून निर्घृण खून ; औरंगाबाद शहर शहारले

औरंगाबाद – सख्ख्या बहीण-भावाच्या हत्येने मंगळवारी (दि.९) औरंगाबाद शहर हादरले.शहरातील बीड बायपासवरील एमआयटी चौक परिसरात राहणाऱ्या बहीण-भावाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली.याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

किरण लालचंद खंदाडे (१८, रा. अल्पाइन हॉस्पिटलजवळ, औरंगाबाद) व तिचा भाऊ सौरभ लालचंद खंदाडे (१६) अशी हत्या झालेल्या बहीण-भावांची नावे आहेत. शेतातून आई-वडील सायंकाळी घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली.

किरण ही पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेत होती. तर सौरभ हा शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावीत शिकत होता.

मंगळवारी खंदाडे दांपत्य मोठ्या मुलीला घेऊन शेतात गेले होते. सायंकाळी घरी परतले, तेव्हा त्यांना घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात किरण आणि सौरभ आढळले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

खंदाडे यांच्या घरात टेबलवर चहाचे चार कपही दिसून आले. कोणीतरी ओळखीच्या दोन व्यक्ती घरात आल्या असाव्यात. यातून बहीण-भावाचा घात झाला असल्याचा पोलिसांना संशय आहे. सातारा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.