‘सिक्सर किंग’ रोहितने सलग दुसऱ्या वर्षी मोडला डिव्हिलियर्स, गेलचा विक्रम
रोहितने २ चौकार आणि ३ षटकार यांच्या मदतीने ६१ चेंडूत ३७ धावा केल्या. त्याने वेगवान गोलंदाजांच्या उसळत्या चेंडूंना न घाबरता प्रहार करण्यास सुरुवात केली होती. परिणामी, कर्णधाराने नॅथन लॉयनला त्याला बाद करण्याची जबाबदारी दिली आणि लॉयनने आपली जबाबदारी योग्यपणे पार केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने पहिल्या दिवसअखेर ९ बाद २५० धावा केल्या.
हेही वाचा :- ‘२.०’ ठरतीये बाहुबली
या डावात रोहित एक उंच फटका मारताना बाद झाला. कसोटी क्रिकेटमध्ये संयम महत्वाचा असतो, पण तो फटका मारण्याच्या नादात बाद झाल्याने त्यावर टीका होत आहे. तरीही बाद होण्याआधीच रोहितने मोठा विक्रम नावावर केला. रोहितने आजच्या ३ षटकारांसह २०१८ या वर्षात क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये मिळून एकूण ७३ षटकार लगावले. एकाच वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला. मागील वर्षांतही रोहितने हा पराक्रम केला होता. गेल्या वर्षी त्याने सर्वाधिक ६५ षटकार लगावले होते.
एका वर्षात तीनही फॉरमॅटमध्ये मिळून सर्वाधिक षटकार लगावणारे टॉप ५ खेळाडू
रोहित शर्मा ७३ (२०१८)
रोहित शर्मा ६५ (२०१७)
एबी डिव्हिलियर्स ६३ (२०१५)
ख्रिस गेल ५९ (२०१२)
शेन वॉटसन ५७ (२०११)