श्रीपाद नाईक यांच्या हस्ते गाझियाबाद इथे राष्ट्रीय युनानी औषधी संस्थेचा पायाभरणी समारंभ संपन्न
नवी दिल्ली, दि.०१ – केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद येसू नाईक यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद इथे राष्ट्रीय युनानी औषधी संस्थेचा अर्थात एनआययूएम पायाभरणी समारंभ झाला. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यावेळी उपस्थित होते. युनानी औषधोपचार आणि इतर आयुष प्रणालींच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण, संशोधन आणि आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या कटिबद्धतेचा एक भाग म्हणून ‘आयुष’ मंत्रालय एनआययूएमची स्थापना करत असल्याचे नाईक यांनी सांगितले.
हेही वाचा :- पोलाद मंत्री एकात्मिक पोलाद प्रकल्पांना सर्वोत्तम कामगिरीबद्दल 25 वा पंतप्रधान चषक करणार प्रदान
10 एकर क्षेत्रातील 300 कोटी रुपये खर्चाची ही संस्था उत्तर भारतातही सर्वात मोठी संस्था असेल असे नाईक म्हणाले. 200 खाटांच्या रुग्णालयामुळे सर्वसामान्यांना आरोग्य सेवा उपलब्ध होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. युनानी औषधोपचार पद्धती ही अनेक विकारांवर विशेषत: त्वचाविकारावर गुणकारी असल्याचे जनरल व्ही. के. सिंग यांनी सांगितले. आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांचही यावेळी भाषण झाले. खासदार, उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातील सदस्य, आयुषचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.