अरुण जेटली यांच्या हस्ते भारतीय स्पर्धा आयोगाच्या कार्यालयाचे उद्घाटन
नवी दिल्ली, दि.३० – भारतीय अर्थव्यवस्था जसजशी विस्तारत जाईल तसतसे स्पर्धा आयोगाचे कामही वाढत जाईल असे मत केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. यावर्षी केवळ आकारमानाच्या मुद्यावर आपण फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेला पार करुन पुढचा क्रमांक गाठला आहे तर पुढच्या वर्षी आपण या स्पर्धेत इंग्लंडलाही मागे टाकून जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ, असा विश्वास यांनी व्यक्त केला. नवी दिल्लीत आज भारतीय स्पर्धा आयोगाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
वेगाने वाढणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षेत्रात विकासाशी निगडित नियमनाची गरज आहे, त्यादृष्टीने स्पर्धात्मक वातावरणात खरेदी बाजारपेठेचे नियमन विविध संस्थांशी समन्वय आणि विलय अशा सर्व गोष्टी हाताळण्यासाठी एक नियामक यंत्रणा अत्यंत आवश्यक आहे. अनेक उद्योग समुहांनी मिळून उत्पादनांची किंमत वाढवणे किंवा आपल्या प्रबळ स्थानाचा दुरुपयोग करुन किंमतींवर परिणाम करत स्पर्धा कमी करणे अशा गोष्टी रोखण्यासाठी दिवसेंदिवस स्पर्धा आयोगाची भूमिका महत्वाची ठरणार आहे असे ते म्हणाले.
देशाच्या सर्वांगीण विकासाचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी तुलनेने मागे राहिलेल्या ईशान्य भारताकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, ईशान्य भारताचा वेगाने विकास व्हावा यासाठी प्रयत्न सुरु असून आता त्या भागाचा विकास होण्याची अपेक्षा आहे, असे जेटली यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाला स्पर्धा आयोगाचे अध्यक्ष सुधीर मित्तल आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.