मुंबई आसपास संक्षिप्त

इयत्ता अकरावीच्या ९९ हजारांहून अधिक जागा रिक्त

मुंबई– इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालनालयाकडून राबविण्यात आलेल्या तीन फेऱ्यांमध्ये दोन लाख ७६ हजार विद्यार्थ्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून इयत्ता अकरावीत प्रवेश घेतला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, पालघर, पनवेल या भागातील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. मात्र अकरावीच्या ९९ हजार ७६ जागा रिक्त राहिल्या आहेत. दिवाळीनंतरही इयत्ता अकरावीच्या प्रवेशाला मुदतवाढ देण्यात येणार आहे.‌

३४ हजार विद्यार्थ्यांना जात वैधता आणि प्रमाणपत्रांचे वाटप

मुंबई– राज्य शासनातर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ उपक्रमात विविध ठिकाणी ६ हजारांहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.‌ या कार्यक्रमांचा सुमारे तीन लाख नागरिकांनी लाभ घेतला.‌ ३४ हजार विद्यार्थ्यांना जातवैधता आणि जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.‌

कृषी, ग्राम आणि शिक्षण सेवकांचे मानधन वाढविण्याची मागणी

मुंबई– कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सेवक म्हणून काम करणाऱ्यांना २५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने केली आहे.‌ कृषी सेवक ग्रामसेवक आणि शिक्षण सेवक यांच्या मानधनात सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या समितीने ही सूचना केली आहे. कृषी सेवक आणि प्राथमिक शिक्षकांना ६ हजार रुपयांऐवजी १६ हजार रुपये, माध्यमिक शिक्षकांना ८ हजार रुपयांऐवजी १८ हजार रुपये तर उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांना ९ हजार रुपयांऐवजी २० हजार रुपये मानधन देण्याची शिफारस करण्यात आली आहे

सहावे अखिल भारतीय अहिराणी संमेलन धुळ्यात

मुंबई,- सहावे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन येत्या डिसेंबर महिन्यात धुळे येथे होणार आहे खानदेश साहित्य संघाच्या
नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खानदेश साहित्य संघाच्या धुळे शाखेकडून हे संमेलन होणार आहे.‌ साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ प्रकाशन, प्रकट मुलाखत, चर्चासत्र, कवी संमेलन, खानदेशी लोकधारा कार्यक्रम, अहिराणी नाट्यप्रयोग सादर होणार आहेत.
—–

Leave a Reply

Your email address will not be published.