शरद पवारांनी दिला निवडणुका जिंकण्याचा मंत्र

( म विजय )

मतदान यंत्रावर बारकाईने लक्ष ठेवा
बुथ पातळीवर काम करण्याच्या सूचना
ठाणे (प्रतिनिधी)- गणेश नाईक यांनी नवी मुंबईला विकसीत केले आहे. त्यांनी अखंड काम केले आहे. तरीही त्यांचा मागील निवडणुकीमध्ये पराभव झाला. त्यामुळे त्यांचा पराभव हा मतदान यंत्रातील गडबडीमुळेच झाला असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मतदान प्रतिनिधीसह मतदान यंत्रावर बाराकाईने लक्ष ठेवावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.
शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमधून आज काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्याचा मंत्र दिला. या प्रसंगी राष्ट्रवादी कौंग्रेसचे नेते गणेश नाईक, आ. जितेंद्र आव्हाड, आ. संदीप नाईक, मा. खा. संजीव नाईक, नवी मुंबईचे महापौर जयंवत सुतार, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, नवी मुंबई शहराध्यक्ष अनंत सुतार, भाईंदरचे शहराध्यक्ष प्रकाश डुबोले, प्रदेश सरचिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक, ठाणे- नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, महिला, युवक, युवती, विद्यार्थी, अल्पसंख्यांक, ओबीसी, सामाजिक न्याय विभाग आदी सेलचे अध्यक्ष आणि शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार यांनी यावेळी सांगितले की, ठाणे लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत संजीव नाईक यांचा पराभव झाला होता. संजीव नाईक हे जागरुक सदस्य होते. संसदेत त्यांनी मांडलेले मुद्दे आपण स्वत: पाहिलेले आहेत. तरीही, आपण कुठे तरी कमी पडलो आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. नवी मुंबईला गणेश नाईक यांनी आदर्श शहर केले आहे. अखंड काम करणार्‍या व्यक्तीचा पराभव होण्यामागे मतदान यंत्रातील गडबडी हेच कारण आहे. सहा महिन्यापूर्वी गोंदिया- भंडारा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत 700 बूथवरील मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाला होता. कोणालाही मत दिले तर ते ठराविक चिन्हालाच जात होते. ही बाब तत्कालीन उमेदवार कुकडे यांनी सांगितल्यानंतर आपण निवडणूक अधिकार्‍यांशी बोलून मतदान यंत्रे बदलून वेळ वाढवून घेतली. त्यानंतर झालेल्या मतदानात कुकडे हे विजयी झाले. त्यामुळे आपण कार्यकर्त्यांनी मतदान यंत्रावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आपला पराभव केवळ मशीनमधील गडबडीमुळेच होऊ शकतो. त्यासाठी मतदानाच्या दिवशी सकाळी सहा वाजताच केंद्रावर जाऊन मतदान यंत्राची तपासणी करावी. व्हीव्हीपॅट संदर्भात ते म्हणाले की, मतदान यंत्रावर मतदान केल्यानंतर जमा करण्यात येणार्‍या चिठ्यांपैकी 50 टक्के चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी आपण केली आहे.
भाजप सरकारवर टीका करताना, ‘वास्तवापासून लांब नेऊन जनतेला फसवण्याचे काम आपल्या चुकीच्या आश्वासनांच्या माध्यमातून भाजप सरकारने केले आहे. शिवस्मारक, इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडरकर स्मारकाच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. समृद्धी महामार्गाचा गाजावाजा करण्यात आला आहे. त्यासाठी जमीनी संपादीत करण्यात आलेल्या नाहीत. जिथे जमिनी संपादीत केल्या आहेत. तेथे योग्य मोबदला देण्यात आलेला नाही. धनगर आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीतही फसवण्याचे काम करण्यात आलेले आहे. धनगरांनी बारामतीमध्ये उपोषण केले. त्यावेळी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनगर बांधवांना सत्तेवर आल्यानंतर एका आठवड्यात आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन पाच वर्षातही पाळण्यात आलेले नाही. आमच्या सरकारने मुस्लीम बांधवांना दिलेल्या सवलती आणि आरक्षण या सरकारने बाजूला टाकले आहे. नोटाबंदीच्या काळात महाराष्ट्रात 100 जणांना बँकेच्या रांंगेतच आपले प्राण त्यागावे लागले होते. रोजगार देण्याची भाषा मोदींनी केली होती. मात्र, नोटाबंदीमुळे सुमारे 15 लाख लोकांचे रोजगार गेले आहेत. गेल्या साडे चार वर्षात सुमारे 11 हजार 998 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकर्‍यांच्या कजमाफीची घोषणा करण्यात आली असली तरी ती 50 टक्के शेतकर्‍यांपर्यंतही पोहचलेली नाही. सन 2007 मध्ये 350 कोटीमध्ये घेण्यात येणारे राफेल विमान हे सरकार आता 1660 कोटी रुपयांत फ्रान्सकडून घेत आहे. त्याचेही काम कागदी विमानही ज्यांनी बनवले नाही: त्या अनिल अंबानींच्या रिलायन्सला देण्यात आले आहे. त्यामुळे बोफोर्सची जशी चौकशी झाली. तशी चौकशी राफेलचीही व्हायला हवी आहे.

गणेश नाईक लोकसभा लढण्यास अनुत्सुक
गणेश नाईक हे ठाणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, असे अंदाज वर्तविण्यात येत होते. मात्र, “ आपणाला दिल्लीत जाण्यात रस नाही, असे स्पष्टीकरण त्यांनीच दिले आहे. तसेच, निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापेक्षा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठिशी आपण ताकदीने उभे राहू, असेही गणेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच, येत्या 16 तारखेला शरद पवार हे नवी मुंबईत येणार असून तेथे 6 हजार कार्यकर्त्यांशी संवाध साधणार आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email