चारचाकी वाहनात मागील आसनांवर बसणा-यांसाठी आसन पट्टा सक्तीचा
नियमाचे उल्लंघन झाल्यास दंड
मुंबई- चारचाकी वाहनातून प्रवास करणारे चालक आणि मागील आसनांवर बसणाऱ्या प्रवाशांना उद्यापासून (१ नोव्हेंबर २०२२) आसनपट्टा सक्तीचा करण्यात आला आहे. आसनपट्टा लावला नसेल तर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
ओला, उबर यांसारख्या टॅक्सीचालकांनी पोलिसांच्या या सक्तीला विरोध केला नसला तरी काळी-पिवळी टॅक्सीचालक मालकांनी आसन पट्टा सक्तीला विरोध केला आहे.
ज्या वाहनांमध्ये मागील सीटवर आसनपट्टा व्यवस्था नाही अशा वाहनांना तो बसविता यावा यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती. ती मुदत सोमवारी (३१ ऑक्टोबर २०२२) या दिवशी
संपुष्टात येणार आहे.
देशभरात अनेक राज्यांमध्ये रहदारीच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नवी दिल्लीत चालक आणि सर्व सहप्रवाशांनी आसन पट्टा लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईतही याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी १४ ऑक्टोबररोजी जाहीर केले होते.
मोटार वाहन (सुधारित) कायदा २०१९ कलम १९४ (ब) (१) (सीट बेल्ट न लावणे) अंतर्गत चारचाकी मोटार वाहनातील वाहनचालक व इतर प्रवासी यांनी प्रवास करताना सीटबेल्ट न लावल्यास दंडास पात्र असल्याची तरतूद आहे. त्यामुळे सहप्रवाशांना सीटबेल्टची सुविधा नसल्यास वाहनचालकांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत आसनपट्टा बसवून घ्यावा. १ नोव्हेंबरपासून सहप्रवासी विनाआसन पट्टा दिसून आला तर दंडात्मक करावी केली जाईल, असा इशारा वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला होता.
दरम्यान अनेक वाहनचालकांनी अद्यापही मागील आसनांवर आसनपट्टा बसविलेला नाही. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या दंडात्मक कारवाई दरम्यान वाहन चालक, प्रवासी आणि पोलिसांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.