सामाजिक

मराठा, कुणबी ज्ञातीतील विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती – राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई, दि. ४
राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेतून दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

ही योजना २०२३-२४ पासून राबविण्यात येणार असून ‘सारथी’ संस्थेकडून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येणार आहेत. या योजनेसाठी ५ वर्षाकरिता २७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पहिल्या वर्षासाठी २५ कोटी रुपयांच्या खर्चास आज मान्यता देण्यात आली.
या समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येत नाही.

ही बाब लक्षात घेऊन क्यु-एस वर्ल्ड रँकिगमध्ये २०० च्या आता मानांकन असलेल्या शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.

अभियांत्रिकी, वास्तुकला, व्यवस्थापन, विज्ञान, वाणिज्य, अर्थशास्त्र, कला, विधी, औषध निर्माण या अभ्यासक्रमांसाठी ५० पदव्युत्तर, पदवी, पदविका आणि २५ डॉक्टरेट अशी शाखानिहाय शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *