सरपंच, ग्रामसेवकांचा ऑडीओ ब्रीज सिस्टमद्वारे मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद Live

( म विजय )

जनावरांसाठी टँकरच्या पाण्यात वाढ करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई, दि. ८ : जनावरांनाही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गावातील जनावरांची संख्या लक्षात घेऊन त्याआधारे टँकरच्या पाण्यात वाढ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधीत यंत्रणांना देण्यात आल्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील सुमारे ५०० हून अधिक सरपंच तसेच ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ऑडीओ ब्रीज सिस्टमद्वारे मोबाईलवरुन थेट संवाद साधून दुष्काळी उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील ग्रामसेवकांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. सरपंच तसेच ग्रामसेवकांनी यावेळी त्यांच्या गावांमधील टँकर, पाण्याच्या टाक्या, चारा छावण्या, प्रलंबीत पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, जनावरांसाठीचे पाणी, रोहयोची कामे, जलसंधारणाची कामे, पाणीपुरवठा योजनांसाठी वीजेचा प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून गावातील परिस्थिती त्यांना विषद केली. या मुद्यांची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी संबंधीत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, बीडीओ यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

चारा छावणी उपलब्ध होण्यासाठीच्या अटी शिथील करण्यात याव्यात अशी मागणी औरंगाबाद जिल्ह्यातील सरपंचांनी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मागच्या काळात चारा छावण्यांच्या बाबतीत अनियमीतता झाल्याने कॅगच्या अहवालानुसार काही अटी टाकण्यात आल्या आहेत. पण तरीही विचार करुन त्यातील काही अटी शिथील करु, असे ते म्हणाले.

टँकरच्या फेऱ्यांबाबत तहसीलदरांना सूचना

औरंगाबाद जिल्ह्यातील अमोल डकाले यांनी त्यांच्या गावासाठी टँकरच्या २ फेऱ्या मंजूर आहेत. पण प्रत्यक्षात टँकरची एकच फेरी गावात येते असे सांगितले. त्याची दखल घेत तहसीलदारांनी याची नोंद घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली.

मनरेगातून ‘मागेल त्याला रोजगार’

सिल्लोड तालुक्यातील सरपंच म्हणाले की, गावात रोजगाराची वाणवा आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मनरेगा योजनेंतर्गत ‘मागेल त्याला रोजगार’ देण्यात येत आहे. मनरेगा योजनेतून मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करण्यात आली असून ती गावात राबवून लोकांना रोजगार मिळवून द्यावा. मनरेगाअंतर्गत विविध २८ प्रकारची कामे वाढविण्यात आली आहेत. यामध्ये शाळेच्या कंपाऊंडपासून विविध कामे करता येतात. याचा लाभ घेऊन लोकांना रोजगार देण्याबरोबर गावात पायाभूत सुविधांची शाश्वत कामे तयार करण्यात यावीत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

रमजानचा पवित्र महिना चालू असून त्यासाठी टँकरच्या पाण्यात तसेच त्यांच्या फेऱ्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यातील सरपंचांनी केली. त्याची दखल घेत याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली.

कन्नड तालुक्यातील वैशाली भोसले यांनी गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून विहीर मंजूर झाल्याचे सांगितले. पण शेजारच्या गावाच्या विरोधामुळे विहीर खोदता येत नाही, असा प्रश्न मांडला. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रश्नी लक्ष घालून दोन्ही गावांना सोबत घेऊन पाणीप्रश्न सोडवावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

गावात पाणी आहे, पण ती साठवण्यासाठी टाकी नाही, असा प्रश्न औरंगाबाद जिल्ह्यातील जगदीश राजपूत यांनी मांडला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या विषयात लक्ष घालून दुरुस्ती योजनेतून गावाचा पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email