लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करणे ही नागरिकांची जबाबदारी

मुंबई, दि.२७ – लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी मतदान करणे ही प्रत्येक नागरीकाची जबाबदारी आहे, असे सांगत व्यवस्था सुधारायला हवी असेल, तर मतदान करण्याची जबाबदारी नागरिकांनी घेतलीच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांनी आज नागरिकांशी संवाद साधला. निवडणूका निष्पक्ष आणि स्वतंत्र व्हाव्यात, तसेच प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगासह सर्व राज्यांचे निवडणूक आयोग सुरक्षा दले आणि अनेक कर्मचारी अविरत झटत असतात. त्यांच्या या प्रयत्नांची आपण मतदान म्हणून कदर करत, मतदान करायला हवे, असे ते म्हणाले. मन की बातच्या आज झालेल्या 52 व्या भागात पंतप्रधानांनी देशाचा अंतराळ कार्यक्रम, क्रीडा क्षेत्रात खुळाडूंनी अलिकडे मिळवलेले यश, आगामी परीक्षा, स्वच्छता अभियान, अशा विविध विषयांवर श्रोत्यांशी संवाद साधला. त्याशिवाय, नेताजी सुभाष चंद्र बोस, गुरुदेव रविंद्रनाथ टागोर आणि संत रविदास या महान व्यक्तींच्या कार्याविषयीही माहिती दिली. जानेवारी महिना परीक्षेचा काळ सुरु होणारा महिना आहे, असे सांगत येत्या 2 दिवसांनी म्हणजे येत्या 29 जानेवारीला आपण देशभरातल्या विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ करणार आहोत, असे मोदी यांनी सांगितले. तणावमुक्त परीक्षेवर आपण विद्यार्थ्यांशी बोलू असेही ते म्हणाले.

हेही वाचा :- राष्ट्रीय मतदान दिनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपतींनी केले संबोधित

खेलो इंडिया स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंनी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांनी खेळाडूंचे कौतुक केले. अत्यंत सामान्य घरातून आलेल्या या खेळाडूंनी या स्पर्धेत असामान्य यश मिळवले आहे, असे मोदी म्हणाले. अशा स्पर्धांमधून भारताच्या गावागावात दडलेल्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन मिळेल आणि इतर खेळाडूंना त्यातून प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अंतराळ क्षेत्रात भारताने केलेली प्रगती लक्षणीय आहे, असे कौतुकोद्गार पंतप्रधानांनी काढले. अंतराळ तंत्रज्ञान आणि उपग्रहांचा उपयोग सरकारच्या अनेक योजना राबवतांना होतो आहे. विशेषत: सर्वांसाठी घरे, मनरेगा, रेल्वे आणि रस्ते सुरक्षा, नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण, अशा सर्व क्षेत्रात देशाची अंतराळ शक्ती वरदान असल्याचे सिद्ध होत आहे, असे ते म्हणाले. विशेषत: युवा वैज्ञानिकांनी तयार केलेले उपग्रह अवकाशात झेपावत आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे पंतप्रधान म्हणाले. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांचेही स्मरण केले. नेताजींच्या आठवणींचा लाल किल्ल्यात असलेल्या संग्रहाचे रुपांतर आता सुंदर अशा संग्रहालयात केले आहे, असे त्यांनी सांगितले. अंदमान-निकोबार इथल्या सुभाषबाबूंच्या कार्याची माहिती देतांनाच रेडिओशी सुभाषबाबूंचे असलेले नातेही पंतप्रधानांनी सांगितले.

हेही वाचा :- प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘दांडी यात्रे’च्या संकल्पनेवर आधारित देखणा चित्ररथ

गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या कलाकृती बघण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या संत रविदासजी यांच्या कार्याचाही पंतप्रधानांनी गौरव केला. रविदासजी यांनी आपले पूर्ण आयुष्य जातीभेद दूर करण्यात घालवले, असे सांगत माणसाला केवळ माणूस म्हणून बघण्याची दृष्टी प्रत्येकामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांचा आवडते अभियान ‘स्वच्छ भारत’ याचाही त्यांनी मन की बात मध्ये उल्लेख केला. या अभियांतर्गत, आतापर्यंत 5 लाख 50 हजार गावे हागणदारीमुक्त झाली आहेत, असे सांगत संपूर्ण भारताला हागणदारीमुक्त करण्याचे उद्दीष्ट आपण 2 ऑक्टोबर 2019 या निश्चित तारखेच्या कितीतरी आधी पूर्ण करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गावातल्या सरपंचांनी स्वच्छ गावांची छायाचित्रे ‘#MyIzzatghar’ या पोर्टलवर टाकावीत, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email