गोसीखुर्द प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या २६ गावांना पुनर्वसनाचा दिलासा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

मुंबई- भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द (ता. पवनी) राष्ट्रीय सिंचन प्रकल्पामुळे बांधित होणाऱ्या भंडारा विधानसभा क्षेत्रातील २६ गावांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिले.

या गावांच्या पुनर्वसनाच्या मागणीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस आमदार नरेंद्र भोंडेकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, यांच्यासह विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, लाभ क्षेत्र विकास मंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गोसीखुर्द प्रकल्पामुळे भंडारा जिल्हातील ३४ गावे पुर्णतः आणि ७० गावे, अंशतः गावठाणे बाधित झाली आहेत. या व्यतीरिक्त वैनगंगा नदीच्या काठावरील उंचावर वसलेल्या अशा २६ गावठाणातील गावांना गोसीखुर्द जलाशयाच्या वाढणा-या जलपातळीमुळे जोखीम पत्करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा २६ या गावांनी सुरक्षितता व आरोग्याच्या दृष्टीने पुनर्वसनाची मागणी केली होती. त्यावर या बैठकीत चर्चा झाली.

या गावांच्या पुनवर्सनाबाबत नुकत्याच तयार करण्यात आलेल्या नव्या पुनर्वसन धोरणानुसार निर्णय घेण्यात यावा. त्यासाठी संबंधित गावातील नागरिकांना विश्वासात घेऊन, तसेच त्यांना पुनर्वसनाबाबतच्या उपाययोजनांची माहिती द्यावी. जिल्हाधिकारी कार्यालयाने या गावांचे ठराव व त्या अनुषंगाने प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागास सादर करावेत असे सूचनाही देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.