पर्यावरणाबरोबरचे संबंध सहकार्यावर आधारित असायला हवे-डॉ. महेश शर्मा
नवी दिल्ली, दि.०८ – वन्यजीव आणि पर्यावरणाच्या रक्षणात आघाडीची भूमिका बजावण्याचे आवाहन मुलांना करताना पर्यावरणाबरोबरचे आपले संबंध सहकार्यावर आधारित असायला हवे, असे पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत नॅशनल झू लॉजिकल पार्क येथे वन्यजीव सप्ताह या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना ते संबोधित करत होते. वन्यजीवांचे आश्रयस्थान असलेल्या जंगलांवर मानवाने अतिक्रमण केले असून वन्य जीव संवर्धनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुलांच्या चिकाटीचा वापर करता येईल, असे ते म्हणाले. केवळ आपल्याच देशात नद्या, जंगले आणि प्राण्यांची पूजा केली जाते, असे शर्मा म्हणाले.
कुठलाही कार्यक्रम लोकसहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही, असे वन खात्याचे महासंचालक डॉ. सिद्धांत दास यांनी यावेळी सांगितले. भारतात जगातील जमिनीपैकी केवळ 2.5 टक्के जमीन असून सुमारे 18 टक्के वन्यजीव येथे आढळतात, असे ते म्हणाले.
दरवर्षी 2 ऑक्टोबरपासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो.