भाषण नव्हे वाचन – शेखर जोशी

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मैदानावर होणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याची आणि तिथे होणा-या भाषणाची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आव्हान म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वांद्रे येथे होणारा हा दसरा मेळावा प्रतिष्ठेचा केला होता. गर्दीच्या दृष्टीने विचार केला तर मुख्यमंत्री शिंदे त्यात यशस्वी झाले असे म्हणता येईल मात्र भाषणाच्या दृष्टीने विचार केला तर मुख्यमंत्री त्यात अपयशी ठरले असे म्हणावे लागेल.

दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण हे ‘भाषण’ ‘न ठरता ‘वाचन’ झाले.‌

मुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण म्हणजे वाचन होते असे म्हणत असलो तरी यातून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करण्याचा कोणताही उद्देश नाही किंवा शिंदे यांचे भाषण कसे पडले आणि उद्धव ठाकरे यांचे भाषण कसे गाजले असेही म्हणावयाचे नाही.

उद्धव ठाकरे यांचे भाषण नेहमीप्रमाणेच ‘टोमणे भाषण’च होते.‌ त्यात कोणताही नवा मुद्दा किंवा विषय नव्हता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाच्या शैलीत उद्धव ठाकरे बोलायला जातात परंतु ते बोलणे हास्यास्पद आणि विनोदी ठरते.

बाळासाहेबांच्या भाषणाची शैली किंवा छाप राज ठाकरे यांच्या भाषणात नक्कीच जाणवते.‌

या आधीही उद्धव ठाकरे यांनी सातत्याने टोमणेगिरी केलली आहे, करत आलेले आहेत. मात्र कालच्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नातू आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा पुत्र (रुद्रांश) जो अवघ्या दीड वर्षांचा आहे त्याला आपापसातील भांडणात आणण्याची काहीही गरज नव्हती.

असो तो विषय या लेखाचा नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण संपायला काही मिनिटे शिल्लक असताना मुख्यमंत्री शिंदे बोलायला उभे राहिले.‌ उद्धव यांनी भाषणात जे मुद्दे मांडले त्याचा प्रतिवाद करणे, त्याला रोखठोक उत्तर देणे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकरता आवश्यक होते हे जरी मान्य केले तरी त्यांनी त्यांचे भाषण उस्फूर्तपणेच करायला हवे होते.

भाषणातील बराच वेळ मुख्यमंत्री शिंदे हे कागदावर लिहून आणलेले मुद्दे वाचून दाखवत आहेत म्हणजेच ते भाषण न करता वाचन करत आहेत असे दिसून आले. त्यामुळे त्यांचे भाषण प्रभावी आणि परिणामकारक झाले नाही.

अपवाद आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर ते उद्धव ठाकरे यांना भेटायला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या प्रॉपर्टीविषयीची विचारणा केली तो भाग किंवा शिंदे-फडणवीस सरकार आगामी काळात महाराष्ट्रासाठी काय करणार आहे त्याची दिलेली माहिती.‌

उस्फुर्तपणे भाषण न करता त्याचे वाचन करावे असा बदलला मुख्यमंत्री शिंदे यांना त्यांच्या ज्या कोणी सल्लागारांनी दिला तो अत्यंत चुकीचा ठरला.

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अभिनंदनचा ठराव मांडण्यात आला होता. त्या अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी जे मनमोकळे, उस्फूर्त आणि अतिशय प्रांजळ असे जे भाषण केले होते त्या भाषणाची आठवण कालच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने झाली.

मुंबई दूरदर्शनची पन्नाशी – शेखर जोशी

विधिमंडळातील शिंदे यांचे ते भाषण विरोधकांना कोपरखळ्या मारणारे, शाल जोडीतले हाणणारे तर प्रसंगी भावूक आणि डोळ्यात पाणी आणणारे होते.‌
त्या भाषणाच्या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जी काही उत्स्फूर्त टोलेबाजी केली ती खरोखरच न विसरता येण्याजोगी होती.

दसरा मेळाव्यातही मुख्यमंत्री शिंदे यांनी तसेच उत्स्फूर्त भाषण करणे अपेक्षित होते. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्द्यांचा प्रतिवादच करायचा होता तर तो त्यांना भाषणाच्या अखेरीसही करता आला असता.

मुख्यमंत्री शिंदे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण जवळपास दीड तास चालले.‌ खरे सांगायचे तर भाषण आता संपेल, मग संपेल असे वाटत असताना ते लांबचच गेले. आपण कुठे थांबले पाहिजे हे ज्याला कळते किंवा भाषण आणखी सुरू राहायला हवे होते, लवकर संपले अशी चुटपुट श्रोत्यांना लागून राहते ते उत्तम भाषण असे सांगितले जाते.

मात्र असे जेव्हा होत नाही तेव्हा श्रोत्यांमध्ये भाषण कधी एकदा संपते अशी चुळबूळ सुरू होते. वांद्रे कुर्ला संकुलातील दसरा मेळावा शक्ती प्रदर्शनासाठी जितका महत्त्वाचा होता तितकाच तो मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा होता. भाषण लांबलचक झाल्याने ते रटाळ आणि कंटाळवाणेही वाटले.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे समर्थक आमदारांनी मुंबईत आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन केले होते. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलेली भाषणे हशा आणि टाळ्या घेणारी झाली होती. मग दसरा मेळाव्याचे भाषण मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्स्फूर्तपणे का केले नाही?

वाचन न करता उत्स्फूर्त भाषण करा असा सल्ला त्यांच्या सल्लागारांनी का दिला नाही? त्यांचे भाषण पडावे, रटाळ व्हावे या उद्देशाने त्यांना चुकीचा सल्ला दिला गेला का? असे प्रश्न साहजिकच मनात येतात.‌

नाही म्हणायला एक गोष्ट मात्र उल्लेखनीय म्हणावी लागेल ती म्हणजे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक खुर्ची व्यासपीठावर ठेवण्यात आली होती. या खुर्चीच्या मागे बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासू सेवक, सहकारी थापा हे उभे राहिलेले दिसून आले.

उद्धव ठाकरे यांनी मुंबईत गटप्रमुखांच्या झालेल्या मेळाव्यात शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते, खासदार आणि सध्या कारागृहात मुक्काम असलेले संजय राऊत यांच्या नावाची एक खुर्ची रिकामी ठेवली होती.

दिवंगत शिवसेनाप्रमुखांची खुर्ची तिथे ठेवावी हे उद्धव ठाकरे यांना सुचले नाही किंवा त्यांच्याकडून केले गेले नाही. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या दसरा मेळाव्यात ते केले. त्याचा भावनिक परिणाम शिवसैनिकांवर नक्कीच झाला असेल असे वाटते.

खरी शिवसेना कोणाची? शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार? उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे असलेले आणखी आमदार, खासदार, किंवा प्रमुख पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे जाणार का?

बॉलीवूडची विकृती, भारतीय संस्कृतीची नालस्ती – शेखर जोशी

हे सगळे प्रश्न चर्चेत असताना प्रतिष्ठेच्या दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांचे भाषण अधिक प्रभावी, परिणामकारक आणि उत्स्फूर्त कसे होईल याची काळजी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सल्लागारांनी घ्यायला हवी होती पण ती घेतली गेली नाही असेच म्हणावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published.