मुंबई दि.१३ :- प्रतिबंधित प्लास्टिकच्या पिशव्या, एकदा वापरून फेकून दिली जाणारी ताटे, चमचे विरोधात मुंबईत येत्या २१ ऑगस्टपासून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार बृहन्मुंबई महापालिका प्रशासन ही कारवाई करणार आहे. या कारवाईसाठी विशेष पथके तयार करण्यात येणार असून पथकात पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) अधिकाऱ्यांचा समावेश असणण आहे. मुंबईतील दुकाने, मंडया, फेरीवाले यांच्याकडील प्लास्टिकच्या पिशव्यांवर कारवाई केली जाणार आहे.
प्रतिबंधित प्लास्टिकच्या वस्तू, पॅकिंगसाठी वापरले जाणारे डबे, एकदाच वापरून फेकून दिल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू यांची साठवणूक करणा-यांवर आणि विक्रेत्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ग्राहकांकडे प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यास त्यांनाही समज दिली जाणार आहे. दंडप्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यास प्रथम गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये, तिसऱ्या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंड व ३ महिन्यांची कैद अशी शिक्षा आहे. या कारवाईसाठी प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयाच्या हद्दीत पाच अधिकाऱ्यांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. यात महापालिकेचे तीन, एमपीसीबी आणि पोलीस दलातील प्रत्येकी एका अधिकाऱ्याचा समावेश करण्यात येणार आहे,