“संगीत क्षेत्रातील चंद्रमा लता” पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकाशन

लतादिदींच्या गायनाची मोहीनी अवघ्या विश्वाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

( म विजय )

मुंबई, दि. 28: लतादिदींबाबतच्या भावना एखाद्या ग्रंथात समाविष्ट होवू शकत नाहीत. अवघ्या विश्वाला सातत्याने त्यांनी मोहिनी घातली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त रवींद्र नाट्य मंदीर येथे झालेल्या अभिष्टचिंतन सोहळा तसेच “संगीत क्षेत्रातील चंद्रमा लता” या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी काढले. यावेळी विविध मान्यवर तसेच त्यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पं. ह्दयनाथ मंगेशकर, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, अभिनेता जॅकी श्रॉफ, गायिका उत्तरा केळकर, संगीतकार आनंदजी, दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी, गायक सुरेश वाडकर, व्हॅल्युएबल ग्रुपचे अमेय हेटे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, अनेक शब्दांच्या भावना त्यातील भाव, अभिव्यक्ती, दिदींच्या गाण्यातून समजते. अनेकांना आपल्या जीवनाची कथा त्यांच्या गाण्यात दिसते. इतक्या वर्षांत त्यांच्या आवाजाची जादू कमी झाली नाही. अशा सोहळ्यास आपण उपस्थित असणे हेच ऐतिहासिक असते. लतादिदींची विविध भाषेतील गाणी आणि त्याचा गोडवा वेगवेगळा आहे. आपल्या पिढीने त्यांचा आवाज ऐकलाच आहे पुढील पिढ्यांनाही हे भाग्य मिळावे, त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावे, अशा सदिच्छाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
पं. ह्दयनाथ मंगेशकर म्हणाले, दिदींच माझ्यावर आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. हे पुस्तक मी दिदीच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीनिमित्त 50 वर्षांपूर्वी प्रकाशित केल्याचंही त्यांनी सांगीतलं.
या पुस्तकातील सर्व लेख वाचण्यासारखे आहेत. दिदींचे गाणे ऐकल्यानंतर मला माझी आई भेटते. विश्वाच्या अंतापर्यत त्यांचं गाणं असेल, अशा भावना शिक्षण मंत्री श्री.शेलार यांनी व्यक्त केल्या.
आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत त्यांच गाणं असेल. तोपर्यंत त्यांचा आवाज असेल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.तावडे यांनी सांगितले.
सगळं जग त्यांच्याबद्दल बोलतयं, हे नावं हजारो वर्षे राहील आणि रहावे, अशी माझी इच्छा आहे, अशी भावना ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांनी व्यक्त केली.
या पुस्तकात विविध मान्यवरांनी लतादिदींबाबतच्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्यासाठी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन अभिनेता सुमित राघवन यांनी केले.
कार्यक्रमस्थळी लतादिदींना शतायुषासाठी शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या शुभेच्छा फलकावर मुख्यमंत्र्यांनी “दिदी म्हणजे अखिल विश्वाचे वैभव” असा स्वाक्षरी संदेश लिहीला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email