महाराष्ट्रातील राजकीय भूकंप आणि भाजपची कसोटी

(शेखर जोशी)
महाराष्ट्रातील राजकीय भूकंप ‘नाटकात’ आमची काहीही भूमिका नाही, हे सरकार आम्ही पाडणार नाही, पडलेच तर ते शिवसेना, महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेदांमुळे पडेल, असे भाजपचेच नेते आत्तापर्यंत सांगत होते.

अर्थात हे साहजिकच आहे. अजित पवार यांच्याबरोबर पहाटेच्या वेळी केलेल्या शपथविधिने तोंड पोळल्यानंतर ताकही फुंकून पिणे अत्यावश्यक आहे, हे कोणीही मान्य करेल.

हे ही वाचा – उद्धव ठाकरे यांचा सोयीस्कर कानाडोळा

मात्र वृत्त वाहिन्यांचा हवाला दिला तर आता भाजपने यात उडी घेतली असल्याचे दिसून येते. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद, उर्वरित आमदारांना मंत्रिपदे, केंद्रात मंत्रिपद अशी बोली लावली गेली आहे.

खरे तर भाजपसाठी हीच कसोटीची वेळ असून आता अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद घ्यायचे की मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाऊन स्वबळावर सत्ता स्थापन करायची हा प्रश्न आहे.

भाजप- शिवसेनेला मतदारांनी कौल दिलेला असतानाही शिवसेनेने दोन्ही कॉंग्रेसबरोबर अनैसर्गिक आघाडी करून सत्ता स्थापन करणे जेवढे अनाकलनीय होते तेवढेच महाराष्ट्रासारखे मोठे, महत्वाचे राज्य भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हातातून का घालविले?

अमित शहा यांनी तेव्हा ठोस प्रयत्न का केले नाहीत? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. कोणी म्हणतात देवेंद्र फडणवीस हे वरचढ होतील, त्यांचे महत्व वाढेल म्हणून,

किंवा विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना युतीला शहा अनुकूल नव्हते आणि फडणवीस होते, मग आता तुमचे तुम्हीच निस्तरा म्हणूनही शहा यांनी प्रयत्न केले नाहीत असे बोलले जाते.

हे ही वाचा – उद्धवजींची ‘अळी मिळी गुप चिळी’

विधानसभा निवडणुकीआधी दोन्ही काँग्रेसमधील ओवाळून टाकलेल्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. आणि नंतर शिवसेनेने दोन्ही काँग्रेसबरोबर युती करून मरणप्राय झालेल्या दोन्ही काँग्रेसना संजिवनी दिली.

खरे तर या राजकीय भूकंप नाटकात ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवून घेणा-या भाजपची कसोटी लागणार आहे.

या आधी विविध आर्थिक घोटाळ्यात ‘प्रविण’ असणा-यांवर भाजपने या आधीच ‘कृपा’ करून पावन करून घेतले तर अन्य काहींनाही हा ‘प्रसाद’ पुन्हा एकदा मिळाला आहे.

शिंदे यांच्या गटात आता जे काही आमदार सामील झाले आहेत त्यातही ‘मातोश्री’ला पन्नास लाखांचे घड्याळ देणा-या ‘यशवंत’ सैनिकाची पत्नी, ठाण्यातील एक ‘प्रतापी’, एक ‘भावना’शील खासदार अशी काही मंडळी आहेत.

या सर्वाच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. शिंदे गटाबरोबर हातमिळवणी केल्यानंतर ही सर्व मंडळीही पावन होणार, त्यांची चौकशीच्या फे-यातून सुटका होणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.

सिंचन घोटाळ्यातील अजित पवार यांच्याबरोबर हातमिळवणी केलेली तेव्हाही योग्य नव्हती असे माझे वैयक्तिक मत तेव्हा होते व आजही आहे.

खरे तर भाजप व शिवसेना यांची युतीच होणे योग्य होते. पण आत्ताच्या परिस्थितीत ही युती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत तरी करू नये.

(महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी आणि पुन्हा एकदा भाजपबरोबर जाण्यासाठी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांना बंडाचे नाटक करायला सांगितले अशीही चर्चा आहे.

आता ही चर्चा खोटी ठरवायची असेल तर उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे पाटणकर, ‘मातोश्री’ दोनचे कथित अवैध बांधकाम, सुशांतसिंह, दिशा सालियन प्रकरणाची तड भाजपला लावावीच लागेल.

संजय राऊत यांच्याबाबतही कारवाईचा ठोस निर्णय घ्यावा लागेल. अनिल परब यांचे काय होणार? ते ही पाहावे लागेल.

आणि ही सगळी प्रकरणे जर गुंडाळली गेली तर भाजप- शिवसेनेच्या पुन्हा एकत्र येण्यासाठीचे हे ‘नाटक होते हे सिद्ध होईल.)

या राजकीय भूकंपात भाजपने माझे वैयक्तिक मत असे आहे की शिंदे शिवसेना, हवेतर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस यांच्यातील आमदार फोडून (ती जबाबदारी अजित पवार यांच्यावर सोपवावी) जो नवा गट तयार होईल त्यांना सरकार स्थापन करू द्यावे.

किंवा ते ही करायचे नसेल तर फक्त शिंदे गट शिवसेनेचे सरकार (उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि उद्धव यांचे बदसल्लागार वगळून) स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि भाजपने या सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा (जसा शरद पवार यांनी भाजपने न मागता दिला होता तसा) आणि आपला ‘रिमोट कंट्रोल’ ठेवावा.

यातून भाजपची पत आणि वटही कायम राहील. किंवा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून सहा महिन्यांत विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक घ्यावी. तेव्हा शिंदे शिवसेना, मनसे यांच्याबरोबर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष युती/आघाडी करावी.

पण उद्धव ठाकरे यांची शिवसेना, दोन्ही काँग्रेस या कोणालाही बरोबर घेऊ नये आणि सन्मानाने ‘मी पुन्हा येईन’ हे खरे करून दाखवावे. तो खरा विजय असेल.

Leave a Reply

Your email address will not be published.