देशातल्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून पंतप्रधानांनी साधला संवाद

नवी दिल्ली, दि.27 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध सामाजिक सुरक्षा योजनांच्या देशभरातल्या लाभार्थ्यांशी आज व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून संवाद साधला. अटल विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि वयवंदना योजना या चार महत्वाच्या सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांचा यात समावेश होता. विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद मालिकेतला हा आठवा भाग होता.

संकटावर मात करुन उभे राहिलेल्यांशी संवाद साधतांना आपल्याला आनंद होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सामाजिक सुरक्षा योजना लोकांना सक्षम करतात. सध्याच्या सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजना जीवनातील अनिश्चिततेचा सामना प्रभावी करण्यात लोकांना साहाय्य करणाऱ्या आहेत. त्याचबरोबर कुटुंबाला वित्तीय विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी त्यांना सक्षम करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

गरीब आणि असुरक्षितांसाठी वित्तीय सुरक्षा पुरवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचे विविध पैलू पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते गरीबांसाठी बँकेची दारे उघडणारे आहेत, लघु उद्योगांसाठी आणि उदयोन्मुख उद्योजकांसाठी भांडवलाची ग्वाही देणार आहेत आणि गरीब व असुरक्षितांना सामाजिक सुरक्षेचे कवच देणारे आहेत.

2014 ते 2017 या काळात प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत 28 कोटी बँक खाती उघडण्यात आली. जगभरात उघडण्यात आलेल्या एकूण बँक खात्यांच्या ती 55 टक्के आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. देशात आता अधिकाधिक महिलांची बँक खाती असल्याबद्दल आणि बँक खात्यांचे प्रमाण 2014 च्या 53 टक्क्यांवरुन 80 टक्क्यांवर पोहोचल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

लोकांवर आलेली संकटे पंतप्रधानांनी जाणून घेतली. एखाद्या व्यक्तीच्या निधनामुळे झालेली हानी कधीही भरून काढता येऊ शकत नाही, पण संकटग्रस्त कुटुंबाला आर्थिक सुरक्षेची हमी देण्यासाठी सरकारने नेहमीच प्रयत्न केले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सुमारे 300 रुपयांचा अत्यंत कमी हप्ता असलेल्या प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेचा लाभ 5 कोटींहून अधिक लोकांना झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या अपघात विमा सुरक्षा योजनेचा लाभ 13 कोटींहून अधिक जणांना मिळाला आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत वर्षाला 12 रुपयांचा हप्ता भरुन लोक दोन लाख रुपयांपर्यंत अपघात विमा सुरक्षेसाठी दावा करु शकतात, असे पंतप्रधानांनी सांगितले.

वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती पंतप्रधानांनी या संवादादरम्यान सांगितली. 60 वर्षांवरील नागरिकांसाठी गेल्या वर्षी सुरु करण्यात आलेल्या वयवंदना योजनेचा लाभ 3 लाखांहून अधिक वृद्ध व्यक्तींना झाला आहे. या योजनेंतर्गत, 10 वर्षांसाठी निश्चित 8 टक्के परताव्याची तरतूद आहे. या खेरीज प्राप्तिकर सवलतीची मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी 2.5 लाखांहून 3 लाखांपर्यंत वाढवण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सरकार प्रतिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

सर्वांना सामाजिक सुरक्षा पुरवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना आणि पेन्शन योजना या तीन महत्वाच्या सामाजिक सुरक्षा योजनांचे कवच गेल्या तीन वर्षात 20 कोटींहून अधिक लोकांना पुरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी विशेषत: गरीब आणि असुरक्षित घटकातल्या नागरिकांच्या कल्याणासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न सुरु ठेवेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी लाभार्थ्यांना दिली.

अत्यंतिक गरज असतांना या योजनांमुळे कशी मदत मिळाली हे विविध सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांनी पंतप्रधानांना उलगडून सांगितले. सरकारच्या योजना अनेकांसाठी जीवन परिवर्तक ठरल्या असून या योजनांसाठी लाभार्थ्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email