पंतप्रधानांचे माजी सैनिकांना संबोधन, राष्ट्रीय युद्ध स्मारक राष्ट्राला समर्पित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे अखंड ज्योत प्रज्वलित करुन राष्ट्रीय युद्ध स्मारक राष्ट्राला समर्पित केले. त्यांनी याप्रसंगी युद्ध स्मारकाच्या विविध दालनांना भेट दिली.  त्यापूर्वी, माजी सैनिकांच्या भव्य सभेला संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की, लाखो सैनिकाचे शौर्य आणि समर्पणामुळेच आज भारतीय सेनेचा जगातील खंबीर सैन्यांमध्ये समावेश होतो. पंतप्रधान म्हणाले की, सैनिक हाच बचावाची पहिली फळी असतो, शत्रूविरोधात आणि नैसर्गिक आपत्तीतही. पंतप्रधानांनी नुकत्याच झालेल्या पुलवामा हल्ल्यातील सीआरपीएफ जवानांच्या आठवणींना उजाळा दिला, आणि देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, नवीन भारताचे जगात स्थान वाढत आहे ते केवळ सशस्त्र दलांमुळे. त्यांनी आज राष्ट्रीय युद्ध स्मारक देशाप्रती समर्पित होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी केंद्र सरकारच्या कार्याची आठवण करुन देताना सांगितले की, सरकारने वन रँक वन पेन्शनचे वचन जवानांप्रती आणि माजी सैनिकांप्रती पूर्ण केले. ते म्हणाले की ओरओपीमुळे 2014 च्या तुलनेत निवृत्तीवेतनात 40 टक्के वाढ, तर सैनिकांच्या वेतनात 55 टक्के वाढ झाली आहे. पंतप्रधान म्हणाले की, सुपर स्पेशालिटी रुग्णालये असावी अशी मागणी होती, त्यानूसार पंतप्रधानांनी तीन सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभारणार असल्याची घोषणा केली. पंतप्रधानांनी सशस्त्र दलांविषयी सरकारचा दृष्टीकोन स्पष्ट करताना सांगितले की, सरकारने सैनिकांना सेना दिवस, नौदल दिन आणि हवाई दल दिन यानिमित्ताने सैनिकांच्या नवकल्पनांना चालना दिली आहे.

तसेच 15 ऑगस्ट 2017 रोजी गॅलंटरी अवार्डस पोर्टलची सुरुवात केली आहे. ते म्हणाले की, महिलांना आता फायटर पायलटस होण्याची संधी मिळत आहे. तसेच शॉर्ट सर्विस कमिशनच्या माध्यमातून महिलांना पुरुषांप्रमाणेच पर्मनंट कमिशनच्या संधी मिळणार आहेत. पंतप्रधान म्हणाले की, संरक्षण खरेदी प्रक्रियेतील बदलामुळे  संरक्षण खरेदी व्यवहारात पारदर्शकता आली आहे. तसेच “मेक इन इंडिया” वर भर दिला.  पंतप्रधान म्हणाले की, संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीमोहिमेच्या 70 प्रमुख मोहिमांपैकी 50 मोहिमांमध्ये भारतीय सेनेचा सहभाग होता, सुमारे 2 लाख सैनिक या मोहिमांमध्ये सहभागी होते. भारतीय नौदलाने 2016 मध्ये आयोजित केलेल्या इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूमध्ये 50 देशांचा सहभाग होता. ते म्हणाले की, दरवर्षी आपले सशस्र दल मित्रराष्ट्रांच्या सशस्त्र दलांसमवेत 10 मोठ्या संयुक्त कवायती करतात. ते म्हणाले की, हिंदी महासागरात चाचेगिरीला आळा बसला आहे तो भारतीय सैन्याच्या कणखरपणामुळे आणि आपल्या आंतरराष्ट्रीय भागीदाऱ्यांमुळे. सैन्यासाठी 1.86 लाख बुलेटप्रूफ जॅकेटांची मागणी बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे, त्याचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षात सरकारने 2.30 लाख बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी केले आहेत. ते म्हणाले की, केंद्र सरकार भारतीय सैनिकांना आधुनिक विमानं, हेलिकॉप्टर्स, पाणबुड्या, जहाज आणि शस्त्र पुरवत आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले देशहिताचे निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्रीय युद्ध स्मारकाशिवाय राष्ट्रीय पोलीस स्मारकाचीही उभारणी करण्यात आली आहे. केंद्र सरकाराने सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या महान नेत्यांचे थोरपण लक्षात घेतले आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकार देशहित सर्वोच्च मानून निर्णय घेत राहणार.      

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email