उद्यापासून प्लास्टिक बंदी, प्लास्टिक वापरणाऱ्यांना ५ हजारांचा दंड

राज्यात प्लास्टिक बंदी घोषित करण्यात आली असून २३ जूनपासून म्हणजेच उद्यापासून राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी होणार आहे. उद्यापासून प्लास्टिकची पिशवी दिसल्यास तब्बल ५ हजारांचा दंड भरावा लागणार आहे. ही कारवाई ज्याचा पुर्नवापर होऊ शकत नाही असे प्लास्टिक वापरणाऱ्यांवर होणार आहे.तसेच बंदी असलेले प्लास्टिक दुकानदार, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल, हॉस्पिटल या सर्व आस्थापनांकडे आढळले तर त्यांना पाच ते वीस हजारांपर्यंतचा दंड होऊ शकतो. हा दंड सर्वसामान्यांसाठी २०० रुपयापर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या विधी समितीने फेटाळल्यामुळे आता मुंबईतही प्लास्टिक वापरणाऱ्यांवर ५००० रुपये दंड आकारला जाणार आहे.
राज्यसरकारने २३ जूनपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्याचा अध्यादेश काढला होता. राज्यसरकारच्या या निर्णयाला प्लास्टिकचे उत्पादक आणि वितरकांनी विरोध केला होता. या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी न्यायालयानं २० जुलैपर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीचा कायदा उद्यापासून राज्यात लागू होणार आहे. सुनावणी लांबणीवर गेली असली तरी सरकारच्या अध्यादेशावर दाद मागण्यासाठी न्यायालयानं व्यापाऱ्यांना ३ आठवड्याचा कालावधी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.