प्रलंबित सुधारित वेतन दर फरकासहित देण्यात यावा – ठेकेदार कामगार संघ ,वीज कंत्राटी कामगार संघाची मागणी
मुंबई, दि. १३
महाराष्ट्रातील १५ उद्योगात किमान वेतन दराची मुदत संपुनही अद्याप सुधारित वेतन दर लागू केलेले नाहीत. प्रलंबित सुधारित वेतन दर फरकासहित देण्यात यावा, अशी मागणी ठेकेदार कामगार संघ , महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने (संलग्न भारतीय मजदूर संघ) केली आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत वांद्रे येथे कामगार आयुक्त सतीश देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
वीज उद्योगातील कंपंन्यांमध्ये सुमारे ४० हजारांहून अधिक कामगार कंत्राटी पध्दतीने काम करत आहेत. या कंत्राटी कामगारांनाही सुधारित वेतन दर, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, धोकादायक उद्योगातील भत्त्यानुसार किमान वेतन दर निश्चीत करावेत, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. या विषयावर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा आयोजित केली जावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे (संलग्न भारतीय मजदूर अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष अमर लोहार आणि अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
——-