परतीच्या पावसाचा कांद्याच्या पिकाला फटका

किरकोळ बाजारात कांदा शंभरी गाठणार?

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.०१ :- राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाचा फटका कांदा पिकाला बसला असून कांदा उत्पादनात घट झाली आहे. परिणामी नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारी कांद्याची आवक घटली आहे. कांदा उत्पादनात झालेली घट आणि घाऊक बाजारात कमी झालेली आवक यामुळे येत्या काही दिवसांत किरकोळ बाजारातही कांदा महाग होणार आहे. महाग झालेला कांदा सर्वसामान्य गृहिणींच्या ड़ोळ्यात मात्र पाणी आणणार आहे.

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाली आहे. येणारा कांदाही भिजलेला असल्याने खराब आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतही दर दिवशी सुमारे १२५ कांदा गाड्यांची आवक होत होती ती आता शंभराच्याही खाली गेली आहे.

कांद्याचे नवीन आलेले पीक परतीचा पावसात खराब झाल्याने राज्यातील कांदा उत्पादन घटले आहे. आवक होणारा कांदाही भिजलेला असल्याने खराब झाला आहे. यामुळे घाऊक बाजारात कांद्याच्या दरात दुपटीने वाढ झाली असून घाऊक दर किलोमागे १५ रुपयांवरुन ३० रुपयांवर पोहोचला आहे.

कांदा शंभरी गाठणार?

किरकोळ बाजारात भाजी विक्रेत्यांकडे सध्या ३५ ते ४० रुपये किलो असा कांद्याचा दर आहे.‌ येत्या काही दिवसांत हा दर किलोमागे शंभर रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.‌

Leave a Reply

Your email address will not be published.