आता सकाळीही ‘बेस्ट’ मुंबई दर्शन – शनिवारपासून बेस्ट उपक्रमाचे हेरिटेज पर्यटन

आसपास मुंबई प्रतिनिधी
मुंबई- बेस्ट उपक्रमातर्फे येत्या २२ ऑक्टोबपासून सकाळी सात वाजल्यापासून दर एक तासाने हेरिटेज पर्यटन सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

बेस्ट उपक्रमातर्फे ३ नोव्हेंबर २०२१ पासून दररोज सायंकाळी मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे आणि प्राचिन वास्तूंचे दर्शन घडविणारी हेरिटेज पर्यटन बससेवा सुरु केली आहे. या खुल्या दुमजली बसगाडीतून गेट वे ऑफ इंडिया, प्रिन्स ऑफ वेल्स म्युशियम, मंत्रालय, विधान भवन, एन.सी.पी.ए. मरिन ड्राइक, चौपाटी, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, राजाबाई टॉवर, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, हॉर्निमन सर्कल, रिझर्व बँक ऑफ इंडिया एशियाटीक लायब्ररी आणि जुने कस्टम हाऊस अशा विविध स्थळांचे दर्शन घडविले जाते.

‘बेस्ट’ उपक्रमातर्फे याआधी सायंकाळी साडेसहा आणि रात्री आठ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथून दोन बस सेवा शनिवार आणि रविवार यादिवशी उपलब्ध होती. या बससेवेला प्रवाशांचा खूप छान प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नरिमन पॉईंट येथून दुपारी तीन आणि सायंकाळी पाच वाजता दोन अतिरिक्त बसफे-या सुरू करण्यात आल्या. मध्यरात्रीपर्यंत दर तासाला ही सुविधा दररोज उपलब्ध असते. त्यानंतर सध्या फक्त शनिवार आणि रविवार या दिवशी सकाळी साडे नऊ आणि अकरा वाजताही दोन अतिरिक्त बसफे-या बेस्ट उपक्रमामार्फत सुरु आहेत.

मुंबईकर आणि पर्यटकांना सकाळच्या मुंबईचे दर्शन घडविण्याच्या दृष्टीकोनातून बेस्ट उपक्रमातर्फे आता सकाळीही ही बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
——-

Leave a Reply

Your email address will not be published.