स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रदूषण मंडळाची नोटीस, सांडपाणी प्रक्रियेत दिरंगाई

कल्याण – सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारून त्यात प्रक्रिया केलेले सांडपाणीच खाडी आणि नदीत सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था गंभीर नसल्याने उल्हास आणि वालधुनी नदीचे प्रदूषण सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच एका समितीने पाहणी केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांडपाणी प्रक्रियाप्रकरणी कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिकेसह अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेस नोटीस बजावली आहे. त्यांना या नोटिशीवर सात दिवसांत खुलासा करण्याचे आदेश मंडळाने दिले आहेत. प्रक्रिया न करताच सांडपाणी उल्हास आणि वालधुनी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे या नद्या प्रदूषित झाल्या आहेत. याविरोधात वनशक्ती या पर्यावरण संस्थेने २०१३ मध्ये हरित लवाद आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ न ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आणली.

हेही वाचा :- केडीएमटीच्या मार्गात लवकरच बदल, आयुक्तांचे आदेश

उल्हास व वालधुनी नदीच्या प्रदूषणास कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिकेसह अंबरनाथ व बदलापूर पालिकांना जबाबदार धरत त्यांना लवादाने १०० कोटींचा दंड ठोठावला. राज्य सरकारने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्यासाठी निधीही उपलब्ध केला. त्यानंतरही प्रकल्प उभारण्यात आलेले नाहीत. राज्य सरकारने त्यांची डेडलाइन डिसेंबर २०१८ पर्यंत आखून घेतली. त्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दिले. मात्र, ही डेडलाइन उलटूनही त्याची पूर्तता झाली नाही. ही बाब वनशक्तीने न्यायालयाच्या निदर्शनास आणली. १० एप्रिलला सुनावणीदरम्यान न्यायालयाने दर पंधरा दिवसांनी प्रकल्पाच्या प्रगतीविषयी पाहणी करून त्याचा एकत्रित अहवाल १७ जुलैच्या सुनावणीदरम्यान सादर करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी यांच्या प्रतिनिधींची एक समिती स्थापन करून या समितीने ३० एप्रिल व १ मे रोजी पाहणी केली असता, सांडपाणी प्रक्रियेच्या कामाची प्रगती असमाधानकारक असल्याचा शेरा मारला. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email