घर नको..घरासाठी जागा द्या; शासन दरबारी बेघर स्वातंत्र्य सैनिकाचे बारा वर्षे टाहो…
(विठ्ठल ममताबादे )
उरण दि.०६ :- गोवा मुक्ती संग्रामातील एका वृद्ध स्वातंत्र्य सैनिकाचे घर पडायला आले असून त्यांना शासकीय उदासिनतेमुळे बेघर होण्याची वेळ आली आहे. रामनाथ सखाराम गायकवाड हे स्वातंत्र्य सैनिक मागील अनेक वर्षा पासून शासनाकडे घरासाठी जागा मागत आहेत. मात्र त्यांना अद्याप शासकीय योजनेतून जागा मिळत नसल्यामुळे येत्या 15 ऑगस्टला उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. शासकीय धोरणानुसार घर बांधण्यासाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या विना मोबदला जमिनीसाठी गेली १२ वर्षे मागणी आणि पाठपुरावा करत आहेत. मात्र उदासीन शासकीय यंत्रणेने वयोवृध्द स्वातंत्र्य सैनिकाच्या मागणीला दुर्लक्षित केल्याने येत्या १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा पीडित स्वातंत्र्य सैनिक रामनाथ सखाराम गायकवाड यांनी विभागीय आयुक्तांना एका पत्राद्वारे दिला आहे.
हेही वाचा :- जीवापेक्षा कर्तव्य महत्त्वाचे ST चालकाने स्टेअरिंगवरच सोडला जीव…
उरण कोटनाका येथे राहणारे रामनाथ सखाराम गायकवाड (८९वर्षे) यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील गोवा मुक्ती संग्रामात सहभागी होऊन देशासाठी मोठे योगदान दिले आहे.मात्र या वयोवृध्द स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग भावनेला आज शासकीय उदासीनता केराची टोपली दाखवत आहे.स्वातंत्र्य सैनिक रामनाथ गायकवाड यांचे उरण कोटनाका येथे जुने राहते घर(म्यू.घ. नं ४११ अ ब क ड)आहे.मात्र सदर इमारत जुनी झाल्याने उरण नगर परिषदेने सदर इमारतीला धोकादायक इमारत म्हणून २०२० साली नोटीस दिली आहे. पर्यायाने सुमारे ३० माणसांचा कुटुंब कबिला असणाऱ्या रामनाथ गायकवाड यांच्या कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली.त्यामुळे रामनाथ गायकवाड यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे घरासाठी स्वातंत्र्य सैनिकांना मिळणाऱ्या विना मोबदला शासकीय जागेची मागणी केली.
हेही वाचा :- जीवनावश्यक वस्तू वरील GST रद्द करा काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन
मात्र २०१० पासून या मागणीचा सतत पाठपुरावा करूनही या वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिकांच्या पदरी निराशाच पडली.शासकीय अनास्थेला वैतागून सखाराम गायकवाड यांनी कोकण विभागीय आयुक्त यांना एक पत्र देवून त्यांना शासकीय जागेसाठी होणाऱ्या त्रासाबद्दल उदिग्न भावना व्यक्त केली असून त्यांना लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास येत्या १५ ऑगस्ट रोजी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या पत्राची दखल घेत कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाने रायगड जिल्हाधकाऱ्यांना एक पत्र देवून स्वातंत्र्य सैनिक रामनाथ सखाराम गायकवाड यांच्या मागणी संदर्भात कायदे व नियमांच्या आधारे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.