मुंबई दि.२१ :- मेंढ्यांच्या पालन-पोषणासाठी चराईक्षेत्रालगतची जमीन अर्धबंदिस्त निवाऱ्यासाठी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करुन दिल्यास मेंढपाळ, धनगर बांधवांच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण होऊ शकेल. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.
राज्यातील धनगर, मेंढपाळ समाजाच्या समस्या सोडवणे तसेच विकासयोजनांच्या अंमलबजावणीबाबत आज उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. मेंढपाळ समाज वर्षोनुवर्षे भटकंतीचे जीवन जगत असून त्यांची फिरस्ती थांबवली पाहिजे. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे.
ज्याप्रमाणे शेळी, कुक्कुटपालनाच्या योजना राबवल्या जातात, त्याच धर्तीवर मेंढ्यासाठी अर्धबंदिस्त निवारा उपलब्ध केल्यास धनगर बांधवांची फिरस्ती थांबेल. यापुढच्या काळात धनगर बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्या लागतील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले.