आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे नाव द्या

 

शेखर जोशी

नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव द्यावे, यावरून वाद-विवाद सुरू आहे. तो लवकर मिटण्याची शक्यता वाटत नाही. या आंतरराष्ट्रीय विमानतळाला आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे नाव द्यावे आणि तेच अधिक संयुक्तिक ठरेल.

नवी मुंबईतील पनवेलजवळील शिरढोण हे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे गाव आणि त्यांचे जन्मस्थळही आहे. शिरढोण येथे वासुदेव बळवंत फडके यांचा वाडाही अजून आहे.नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापासून शिरढोण हे गाव अवघ्या आठ ते दहा किलोमीटरवर आहे. ब्रिटीशांच्या विरोधात वासुदेव बळवंत फडके यांनी सशस्त्र क्रांती केली आणि पुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्व क्रांतिकारकांचे ते प्रेरणास्थान ठरले. त्यांचे हे योगदान सर्वमान्यच आहे.

रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे अध्वर्यू, माजी खासदार, आमदार व पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अशी ‘दिबां’ची महाराष्ट्राला ओळख आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती ‘दिबां’च्याच नावासाठी आग्रही आहे. या मागणीसाठी नुकतेच मानवी साखळी आंदोलनही करण्यात आले.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठीचे लढाऊ नेते म्हणून ‘दिबां’चे योगदान महत्वाचेच आहे. त्यामुळे खरे तर शिवसेनेनेही ‘दिबां’च्या नावाला सहमती द्यायला हवी होती. पण निष्ठा दाखविण्यासाठी किंवा राजकारण म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुढे आणले गेले.

आता नामकरणाच्या वादात राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. नवी मुंबईतील या नियोजित विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. शिवाजी महाराज यांचे नाव पुढे केल्याने वाद होणार नाही, हा त्या मागचा उद्देश असावा. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे.

वासुदेव बळवंत फडके यांचे नाव विमानतळाला द्यावे आणि विमानतळ परिसरात ‘दिबां’च्या नावाने एक भव्य दालन उभे करावे. या दालनात ‘दिबां’चा अर्ध किंवा पुर्णाकृती पुतळा उभारावा. ‘दिबां’च्या जीवनातील महत्वाचे प्रसंग, त्यांचे राजकीय जीवन, प्रकल्पग्रस्तांसाठी त्यांनी केलेले काम, संघर्ष याची माहिती तिथे फलक, छायाचित्रे या स्वरुपात ठेवावी. दृकश्राव्य माध्यमातून ‘दिबां’चा जीवनपट उलगडणारी ध्वनिचित्रफित तयार करून ती मोठ्या पडद्यावर सतत दिसेल अशीही व्यवस्था करावी. हे सर्व करून ‘दिबां’चा योग्य तो सन्मान करता येईल आणि त्यांच्या नावाचा आदरही राखला जाईल.

लहुजी साळवे, उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके यापैकी कोणाला आद्य क्रांतिकारक म्हणायचे यावरून चर्चा, वाद सुरू असतात. हा वाद क्षणभर बाजूला ठेवू या. पण वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म पनवेल जवळ शिरढोण येथे झाला होता आणि नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या काही अंतरावर हे गाव आहे. त्यामुळे ‘दिबा’, ठाकरे की शिवाजी महाराज या नामकरण वादात इतके निमित्त वासुदेव बळवंत फडके यांचे नाव देण्यासाठी संयुक्तिक व पुरेसे आहे.

त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, दि.बा. पाटील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रती पूर्ण आदर ठेवून मला असे वाटते की नवी मुंबईतील या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचेच नाव दिले जावे.

जाता जाता- बाळासाहेब ठाकरे, दि. बा. पाटील, छत्रपती शिवाजी महाराज यापैकी कोणाच्याही नावावर आम्ही अंतिम निर्णय घेतलेला नाही आणि आत्ता घेणारही नाही. विमानतळ बांधून पूर्ण झाल्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. नामकरणावरून नाहक वाद, राजकारण कोणीही करु नये.अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे घेतली तर कदाचित हा वाद तात्पुरता तरी शमेल असे वाटते.
©️शेखर जोशी
२६ जून २०२१

Leave a Reply

Your email address will not be published.