Kalyan ; देवगंधर्व महोत्सवाच्या पहिल्या दोन्ही पुष्पातील अदाकारीने संगीतप्रेमी तृप्त

कल्याण दि.१४ :- शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसाराचा वसा गेली ९४ वर्षे समर्थपणे पेलणाऱ्या कल्याण गायन समाजाच्या देवगंधर्व महोत्सवाच्या पहिल्या दोन्ही पुष्पातील अदाकारीने कल्याण-डोंबिवलीकर संगीतप्रेमी तृप्त झाले. महोत्सवाचे यंदाचे हे अठरावे वर्ष आहे. तरुण प्रतिभावान तसेच बुजुर्ग प्रस्थापित कलाकारांचा समतोल हे या वर्षीच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. महोत्सवाची सुरूवात या वर्षीचे महोत्सवाचे अध्यक्ष राम धस, उपाध्यक्ष अविरत शेटे व महोत्सवाचे प्रायोजक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. १३, १४ व १५ डिसेंबर अशा तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शास्त्रीय सहगायन व सतारवादन अशी मेजवानी रसिकांना मिळाली.

हेही वाचा :- सोमवारी २७ गावांचा केडीएमसी मुख्यालयावर धडक मोर्चा

पहिल्या सत्राची सुरूवात गायनाचा पिढीजात वारसा लाभलेल्या भगिनी अपूर्वा गोखले व पल्लवी जोशी यांच्या सहगायनाने झाली. रागेश्री व बागेश्री या दोन रागांच्या मिश्रणाने बनलेल्या मालगुंजी रागातील तिलवाडा तालातील बन मे चरावत गैया…या बंदिशीने मैफिलीची सुरूवात करणाऱ्या दोघी भगिनींनी आलापी, बंदिश, बोलआलाप, सरगम, ताना, अशा विविध अंगानी राग खुलवत नेला. सहगायनातील दोघींचा ताळमेळ वाखाणण्यासारखा होता. रैन का रे डरावन लागे रे…या द्रुत तीनतालातील बंदीशीने त्यावर कळस चढवला. दोघा भगिनींना अभय दातार व अनंत जोशी यांनी अनुक्रमे तबला व हार्मोनियमवर तेवढीच तोलामोलाची साथ दिली. राग नायकी कानडामध्ये विलंबीत त्रितालमधील बनरा मोरा प्यारा…व द्रुत तीनतालातील नैना नही माने बरसे…बंदिशीने पहिल्या सत्राची सांगता झाली.

हेही वाचा :- जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यात बदल

सुप्रसिद्ध सतारवादक पुर्बायन चॅटर्जी हे दुसऱ्या सत्राचे मानकरी होते. सत्राच्या सुरूवातीला सादर झालेल्या झपातालातील खंबावती रागाने पहिल्या काही क्षणांतच रसिकांचा कब्जा घेतला. आलापी, जोड, गत, झाला अशा विविध अंगानी राग उत्तरोत्तर रंगत गेला. खंबावतीनंतर मन मंदिरा या कट्यार काळजात घुसली या लोकप्रिय चित्रपट गीताची धून पेश झाली. मैफिलीची सांगता राग मिश्र पिलूमधील एक धून वाजवून झाली. सतारीसारख्या वाद्याच्या मैफिलीमध्ये रंगत आणण्यात सिंहाचा वाटा तबल्यावरील साथीदाराचा असतो. दिग्गज तबलावादक सत्यजित तळवलकर यांनी आपल्या पूरक व प्रेरक वादनाने मैफिलीत आगळावेगळा रंग चढवला. दर्जेदार शास्त्रीय संगीत अनुभवल्याचे समाधान सर्व रसिकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होते. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पं. कैवल्य गुरव व राकेश चौरसिया यांच्या कलेचा आनंद घेता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.