मुंबई पारबंदर- एमटीएचएल प्रकल्प आर्थिक भरभराट आणेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महत्वाकांक्षी समुद्री पुलाची मुख्य भूमीशीप्रत्यक्ष जोडणी पूर्ण
मुंबई, दि. २४
मुंबई पारबंदर अर्थात ‘एमटीएचएल’ प्रकल्प आर्थिक भरभराट आणणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.
मुंबई पारबंदर प्रकल्पांतर्गत ‘एमटीएचएल’ या महत्वाकांक्षी समुद्री पुलाची मुख्य भूमीशी प्रत्यक्ष जोडणी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल, असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी यावेळी जाहीर केले.
हा प्रकल्प मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील सामाजिक आर्थिक परिस्थिती पालटून टाकणारा ठरणार आहे.

हा समुद्री पूल साकारण्याचे मोठे आव्हान होते. पण ते एका सांघिक भावनेने पेलण्यात आले. हा पुल पुढे मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे, आणि मुंबई -गोवा मार्गाला जोडण्यात येणार आहे. यामुळे तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात शैक्षणिक, औद्योगिक आणि सेवा क्षेत्र यांचा विकास होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हा समुद्री पूल अभियांत्रिकीचा चमत्कार समजला जाईल. गेली तीस पस्तीस वर्षे अशा प्रकारचा पूल केवळ चर्चेतच होता. तो आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी आणि पाठबळाच्या जोरावर पूर्ण होत असल्याचा आनंद असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी खासदार राहुल शेवाळे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, जपानचे मुंबईतील वाणिज्यिक दूतावास प्रमुख डॉ. फुकाहोरी यासुकाटा, “जायका”च्या भारतातील प्रमुख इव्हा मोतो, प्रकल्प आकारास आणणारे एल अँड टी, देवू, आएएचाय चे अभियंते, तांत्रिक अधिकारी, कर्मचारी, मजूर आदी उपस्थित होते.
——

Leave a Reply

Your email address will not be published.