आरेमध्ये भररात्री वृक्षतोडीस सुरुवात, झाडे कापल्याचे पाहून पर्यावरणप्रेमींचे अश्रू अनावर

मुंबई दि.०५ :- आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकरणी सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर संध्याकाळी सातच्या सुमारास आरेतील झाडांची कत्तलही सुरु झाली. इलेक्ट्रिक करवतीने झाडे तोडली जात असताना नागरिकांपर्यंत आवाज आणि माहिती पोहोचल्याने रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी आरे मेट्रो कारशेडच्या जवळ गर्दी केली. झाडांच्या कत्तलीवरुन नागरिक इतके संतप्त झाले की घटनास्थळी पोलिसांनी बोलवावे लागले. आरेत वृक्षतोड होत असल्याचे समजताच भांडुप, पवई, अंधेरी, गोरेगाव येथील पर्यावरणप्रेमींसह सामाजिक संस्था, विविध ग्रुप, स्थानिकांनी येथे गर्दी केली. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस दाखल झाले. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू होते. वृक्ष तोडीस विरोध करण्यासाठी दाखल पर्यावरण प्रेमीना प्रकल्प स्थळी जाण्यास पोलीस प्रशासनाने मज्जाव केला.

हेही वाचा :- गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या इसमाला पोलिसांनी केली अटक

येथील गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केला जात असतानाच पर्यावरणप्रेमी आणि पोलीसांमध्ये धक्काबुकी झाली. यावेळी पर्यावरण प्रेमींनी महापालिका, मेट्रो प्रशासन यांच्या विरोधात घोषणा दिल्या असून, तीनशे झाडे तोडल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे न्याय मिळत नाही तोवर घटनास्थळाहून बाहेर पडणार नाही, असा निर्धार पर्यावरण प्रेमींनी यावेळी केला.आरेतील झाडे तोडली जात असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे अनेकांपर्यंत पोहचली. ‘आरे वाचवा’ मोहिमेतील मुंबईकर या कृत्याचा विरोध करण्यासाठी आरेमध्ये पोहोचले. प्रत्यदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रीक करवतीने आरेतील जवळपास २०० झाडे तोडण्यात आली आहेत. झाडे कापल्याचे पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले.

Leave a Reply

Your email address will not be published.