मुंबई, ठाणे परिसरात गोवरची साथ

महापालिकांकडून विविध उपाययोजना

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.२७ :- मुंबईसह ठाणे परिसरात गोवरची साथ पसरली असून ठाणे शहरांमध्ये गोवरचे ४४ रुग्ण आढळले आहेत. तर ३०० संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत गोवरचे ६५८ रुग्ण आढळले आहेत. गोवर संशयित रुग्णांची संख्या दहा हजारांहून अधिक आहे. आत्तापर्यंत १३रुग्णांचा गोवरने मृत्यू झाला आहे.

गोवरची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने रुग्णांची संख्या वाढू शकते या पार्श्वभूमीवर हे संक्रमण रोखण्यासाठी बृहन्मुंबई, ठाणे, भिवंडी, वसई महापालिकांकडून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. गोवरचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरण वाढविण्यात येणार आहे. आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून शून्य ते पाच वर्षे वयापर्यंतच्या मुलांना गोवर प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे की, नाही याची माहिती घेण्यात येत आहे.

तसेच ग्रामीण भागात ‘आशा’ कार्यकर्त्या, अंगणवाडी कर्मचारी तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. संशयित रुग्ण आढळल्यास तात्काळ त्या रुग्णाचे रक्त तपासणीसाठी पाठवले जात असून याचा अहवाल शासनाला पाठवला जाणार आहे. मुंबईमधील १० प्रभाग गोवर प्रभावित आहेत. दरम्यान, देशभरात बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, केरळ आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये गोवरचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.