डोंबिवलीत मंगळसूत्र चोराला चोप

डोंबिवली दि.१४ :-  पूर्वेकडील चौकात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवून पळणाऱ्या चोराला नागरिकांनी झोडपले. योगेश पांडे (१९) असे या लुटारूचे नाव असून हा चोरटा विक्रोळी पार्कसाईट परिसरात राहणारा आहे. पी अँड टी कॉलनी क्रॉस रोड परिसरात राहणाऱ्या सुजाता विश्वास धावडे (५५) या गुरुवारी दुपारच्या सुमारास इंदिरा चौकातील मोर्विका नामक दुकानात साड्या बदली करण्यासाठी जात होत्या. दुकानाच्या दारातच पाठीमागून आलेल्या चोराने सुजाता यांच्या गळ्यावर थाप मारली आणि गळ्यातील 2 तोळ्याचे मंगळसूत्र लांबवून पळ काढला. या चोराने केळकर रोडच्या दिशेने धूम ठोकली. सुजाता यांनी जोरजोरात आरडाओरडा केल्याने रस्त्यावरील नागरिकांना पाठलाग करून चोराला पकडले.

हेही वाचा :- गुडवीन ज्वेलर्सचे प्रमुख मालक असलेले सुनिलकुमार आणि सुधीरकुमार मोहनन अकराकरण यांना अटक

त्यानंतर हाती लागलेल्या या चोरावर नागरिकांनी यथेच्छ झोडपले. याच दरम्यान सदर चोराने मंगळसूत्र गिळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रामनगर पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या ताब्यातील चोराला पोलिस ठाण्यात आणले. केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिलमध्ये या लुटारूला वैद्यकीय तपासणीकरिता पाठविण्यात आले. या प्रकरणी सुजाता धावडे यांच्या जबानीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी योगेश पांडे हा सराईत चोर असून अशा प्रकारचे अनेक गुन्हे केले असल्याची त्याने प्राथमिक कबूली दिली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश अहेर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.