पदवी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना एनएसएस, स्काऊट आणि गाईड अनिवार्य करावे-उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, दि.०९ – पदवी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना एनएसएस, स्काऊट आणि गाईड यासारख्या स्वयंसेवी संस्था किंवा सशस्त्र दलामध्ये समाजसेवा करणे अनिवार्य करावे असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी शैक्षणिक संस्थांना केले आहे. समाजसेवांमध्येच सहभागी झाल्यामुळे त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्व, सामाजिक भान आणि एकतेची भावना निर्माण होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. दीनदयालू नायडू यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाच्या समारोप समारंभाला ते संबोधित करत होते.
दूरदर्शी नेत्यांकडून प्रेरणा घेण्याचा अवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. शाळांमध्ये नितीमत्तेचे खास वर्ग घेण्याची सूचना त्यांनी शैक्षणिक संस्थांना केली. सार्वजनिक जीवनात मूल्यांचे खच्चीकरण होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत उपराष्ट्रपतींनी जबाबदार लोकप्रतिनिधींना निवडून देण्याच्या गरजेवर भर दिला. गरीबी, निरक्षरता, हिंसाचार यांसारख्या सामाजिक समस्यांविरोधात लढण्यासाठी जबाबदार नेत्यांची गरज असून सरकारी योजनांचे लाभ गरीबांपर्यंत पोहोचतील हे सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी रचनात्मक कृती आराखडा तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. जलसंवर्धनासाठी ग्रामीण समुदायाला सक्षम करण्यासाठी स्काऊट आणि गाईड चळवळीच्या युवकांनी तसेच सरकार आणि लोकप्रतिनिधींनी काम करावे, असे ते म्हणाले.