मुंबई दि.१६ :- महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्कारांचे वितरण संस्कृतदिनी अर्थात ३० ऑगस्ट या दिवशी करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’कडून करण्यात आली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना याविषयी निवेदन देण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ( २७ जुलै २०१२) शासन निर्णयानुसार ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ संस्कृतदिनाच्या दिवशी देण्यात यावा, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे; मात्र २०१२ पासून आजपर्यंत हा पुरस्कार संस्कृतदिनी देण्यात आलेला नाही. पुरस्कार वर्षअखेरीस डिसेंबर महिन्यात दिले जातात. तसेच दरवर्षी पुरस्कार प्रदान न करता दोन/तीन वर्षांचे पुरस्कार एकत्रितपणे दिले जातात, असे सुराज्य अभियानाचे म्हणणे आहे.
प्राचीन संस्कृत पंडित, वेदमूर्ती, संस्कृत शिक्षक, संस्कृत प्राध्यापक, संस्कृत कार्यकर्ते यासाठी आठ जणांना हा पुरस्कार दिला जातो. ‘संस्कृतदिन’ आता काही दिवसांवर आला आहे. या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्यास पुरेसा अवधी मिळावा, असे ‘सुराज्य अभियाना’चे समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी या निवेदनात म्हटले आहे.
२०२१ ते २०२३ या वर्षांतील पुरस्कार अद्याप घोषित करण्यात आलेले नाहीत. हा पुरस्कार सुरू केल्यापासून गेल्या दहा वर्षांत पुरस्काराच्या रकमेत एक रुपयाचीही वाढ करण्यात आलेली नाही. ही रक्कम वाढविण्याविषयी मंत्रिमहोदयांची भेट घेतली असता, त्यांनी खात्याचे प्रधान सचिव यांना अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्यालाही आता पाच महिने झाले, याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.