‘प्रतापगडाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ले इस्लामी अतिक्रमणांपासून मुक्त करावेत’
महाराष्ट्रातील किमान २२ महत्त्वाच्या गड-किल्ल्यांवर अतिक्रमणे
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.१५ :- ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने ने प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारे अतिक्रमण हटवले, त्याप्रमाणे शासनाने महाराष्ट्रातील अन्य गड-किल्ल्यांवरील अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून त्यांना इस्लामी अतिक्रमणापासून मुक्त करावे, अशी मागणी माजी आमदार आणि ‘शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलना’चे निमंत्रक नितीन शिंदे यांनी केली.
हिंदू जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त,अन्य किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामांचे काय ?’ या विषयावर आयोजित विशेष संवादात शिंदे बोलत होते.
महाराष्ट्रातील किमान २० ते २२ महत्त्वाच्या गड-किल्ल्यांवर अतिक्रमणे झाली आहेत. यांविषयी वन विभाग, राज्य आणि केंद्रीय पुरातत्त्व विभाग या सर्वांना माहिती असून ते या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करत आहेत. वन विभाग, पुरातत्त्व विभाग यांच्यासह महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवावीत, अशी समस्त हिंदू संघटनांची मागणी असल्याचे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी सांगितले.
ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे म्हणाले, अफजलखानाने अनेक मंदिराचा विध्वंस केला आणि अनेक हिंदूंना बाटविले. याच अफजलखानाच्या कबरीचे अनधिकृत बांधकाम प्रतापगडाच्या पायथ्याशी करून त्याचे उद्दात्तीकरण करण्यात आले. या गोष्टींची सर्व शिवभक्तांना चीड येत होती. उच्च न्यायालयाने त्यावेळी अनधिकृत बांधकाम काढण्याचे आदेश तत्कालीन राज्य सरकारला दिले असतांनाही त्याची अंमलबजावणी होत नव्हती. शेवटी सध्याच्या महाराष्ट्र सरकारने हे अनधिकृत बांधकाम तोडले, ही शिवभक्तांना आनंद देणारी गोष्ट आहे. वाई सातारा येथील प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.