पर्यावरण -हास प्रकरणी उरणचे तहसीलदार व रायगड जिल्हाधिकारी यांना उरण सामाजिक संस्थेने बजावली कायदेशीर नोटिस.

(विठ्ठल ममताबादे)

उरण दि.११- उरण तालुक्याची संरक्षक भिंत असलेल्या द्रोणागिरी पर्वताच्या पायथ्याशी मागील 2 वर्षा पासून सुरु असलेले अनधिकृत उत्खनन आणि लाखो रुपयांच्या महसूल चोरी तसेच प्रचंड वृक्षतोड याकडे हेतुपरस्पर दुर्लक्ष केल्याच्या कारणावरुन उरण सामाजिक संस्थेच्या वतीने एड्वोकेट चंद्रहास म्हात्रे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आणि उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्या संदर्भात कायदेशीर नोटिस बजावली आहे. उरण तालुक्यातील द्रोणागिरी पर्वत हा ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. या पर्वताचे भौगोलिक स्थान लक्षात घेवून केंद्र सरकारने ONGC चा देशातील सर्वात मोठा तेल शुद्धिकरण कारखाना या पर्वताच्या कुशीत उभारलेला आहे. करंजा मच्छीमारांच्या बोटींना या पर्वताच्या आडोशामुळे नैसर्गिक आणि सुरक्षित बंदर लाभले आहे. याच पर्वताच्या माथ्यावर शिवकालीन ऐतिहासिक ‘द्रोणागिरी किल्ला’ आहे. तेथूनच ONGC प्रकल्प, मुंबई शहर आणि बाजुलाच असलेल्या नेव्हीच्या भूमिगत शस्त्रागारावर सुरक्षा रक्षकांची 24 तास टेहळनी चालू असते. त्यामुळे उरण तालुक्यातील जनतेत या पर्वताला श्रद्धेचे स्थान प्राप्त झाले आहे.

हेही वाचा :- डोंबिवली ; दोन महिन्यात २५० वाहनचालकाचे परवाने रद्द…

उरण तालुक्यातील मोठ मोठ्या प्रकल्पांसाठीच्या भरावामुळे येथील बहुतांश डोंगर टेकडया उध्वस्त झाल्या आहेत. आता JNPT चे चौथे बंदर आणि प्रस्तावित SEZ प्रकल्पांसाठी लागणा-या मातीच्या भरावासाठी ठेकेदारांची वक्रदृष्टि या पर्वताकडे लागली आहे. दहावर्षापूर्वी काही ठेकेदारांनी तसे प्रयत्नही केले होते. परंतु नागरिक आणि पत्रकारांच्या जागरूकतेमुळे आणि तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या सतर्कतेमुळे आणि कर्तव्यदक्षतेमुळे सदर उत्खनन बंद पाडण्यात आले. याच पार्श्वभूमीवर ‘उरण सामाजिक संस्था’ या सामाजिक संस्थेतर्फे मागील दहा वर्षापासून या पर्वताच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले जात आहे.परंतु मागील 2 वर्षापासून या पर्वताच्या उत्तर बाजूला आणि ONGC प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या 15-20 एकर जागेवर प्रचंड प्रमाणावर अनधिकृत उत्खनन झाले आहे. बहुतांश ठिकाणी चार पाच फुट खोल उत्खनन झाले आहे. डोंगर उतारावरिल टेकडया उध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. तसेच या उत्खननामुळे शेकडो वृक्षांची कत्तल झाल्यामुळे पर्यावरणाचीही अपरिमित हानी झाली आहे. उरण सामाजिक संस्थेतर्फे दोन वर्षापासून सदर अनधिकृत उत्खननाविरोधात जिल्हाधिकारी रायगड आणि तहसीलदार यांच्याकडे अनेकवेळा पत्रव्यवहार झाला.

हेही वाचा :- आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेच्या निमित्ताने भगवान ‘गौतम बुद्धां’च्या अस्थी कल्याणात

लाक्षणिक उपोषण आणि निदर्शनेही झाली.राज्याचे मुख्यमंत्री, महसूलमंत्री,पर्यावरण मंत्री यांना त्यांच्या व्यक्तिशः नावाने निवेदने सादर केली. उरण विधानसभेच्या आमसभेतही उरण सामाजिक संस्थेने हा प्रश्न दोन वेळा उपस्थित केला. त्याची दखल घेवून तहसीलदार उरण यांनी दिड वर्षानंतर जुजबी कारवाई करून उलट ठेकेदारांची पाठराखन केली. संस्थेच्या सततच्या पाठ पुराव्यामुळे रायगड जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी 29 मे 2018 रोजी सदर उत्खननाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी संस्थेच्या पदाधिका-यांनाही तक्रारदार म्हणून निमंत्रित करण्यात आले. तेथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन, पर्वत उतारावरिल टेकडयांचा विध्वंस आणि प्रचंड वृक्षतोड झाल्याचे दिसून आले. हे सर्व डोळ्यापुढे असतानाही सदर स्थळ पाहणीचा अहवाल खनिकर्म अधिकारी आणि तहसीलदार उरण यांनी सादर केलेला नाही. उलट जिल्हाधिकारी रायगड यांनी उरण सामाजिक संस्थेच्या तक्रारी/हरकतीची दखल न घेता आणि मागील जिल्हाधिका-यांच्या पंचनाम्यांचा भंग करून दि.२२/११/२०१८ च्या आदेशान्वये एका ठेकेदाराला सदर जमीनीतून उत्खनन करण्याची परवानगी दिल्याचे संस्थेने माहितीच्या अधिकाराखाली मिळविलेल्या माहितीतून उघड झाले आहे.

हेही वाचा :- डोंबिवली ; प्रवेश बंदी मोडणाऱ्या पोलिसांना शिवनलिनी प्रतिष्ठानने दिले `चॉकलेट ‘

वरिल सर्व बाबींचा उल्लेख जिल्हाधिकारी रायगड आणि तहसीलदार उरण यांना दिलेल्या कायदेशीर नोटीसीत केलेला आहे. तसेच सदर अनधिकृत उत्खनन, महसूलाच्या लाखो रुपयांची चोरी,वृक्षतोड,पर्यावरणाची हानी, संस्थेच्या कार्यकर्त्यांना एका ठेकेदाराने जीवे मारण्याच्या दिलेल्या धमक्या, यास सरकारी अधिकारी म्हणून कोणताही प्रतिबंध न करता जिल्हाधिकारी रायगड आणि तहसीलदार उरण यांनी जाणून बुजुन डोळेझाक करून अप्रत्यक्षपणे समाजकंटकाशी हातमिळवणी केल्याचे दिसून येत आहे. असे सदर नोटिसात नमूद करण्यात आले आहे. सदर नोटीसीतील प्रत्येक परिच्छेदावर समाधानकारक स्पष्टिकरण आणि सखोल कारवाई न झाल्यास डॉ. विजय सूर्यवंशी-जिल्हाधिकारी रायगड आणि श्रीमती कल्पना गोडे-तहसीलदार उरण यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागण्यात येईल असे एड्वोकेट चंद्रहास म्हात्रे आणि तक्रारदार संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटिल, कार्याध्यक्ष भूषण पाटिल आणि उपाध्यक्ष काशीनाथ गायकवाड़ यांनी पत्रकारवर्गांशी सपंर्क साधून तसेच एका प्रसिद्धि पत्रकाद्वारे कळविले आहे.सदर नोटिस दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 च्या कलम 80 अन्वये बजावण्यात आली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email