सारडे विकास मंचच्या संकल्पनेतून प्लास्टिकमुक्त गाव अभियानाचा शुभारंभ प्रत्येक गावात कापडी पिशवीचे वाटप
(विठ्ठल ममताबादे)
उरण दि.२४ – प्लास्टिकमुळे प्रचंड प्रमाणात पर्यावरणाची हानी होत असून त्यामुळे पर्यावरणाच्या संतुलनावरही त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. त्यामुळे प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशवी वापरण्याचा पर्याय जनतेला खुला असून पर्यावरण विषयी जनजागृती करण्याचा तसेच कापडी पिशवीचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करावा या उद्देशाने सारडे विकास मंचच्या संकल्पनेतून,सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर तसेच उरण मधील विविध सामाजिक संस्थेच्या सहकार्याने उरण मध्ये गावागावात विशेषतः पूर्व विभागातील गावागावात जनतेला कापडी पिशवी वाटून प्लास्टिक पिशवी न वापरण्याचा संदेश देण्यात येणार आहे.अश्या या संकल्पनेने प्रेरित प्लास्टिकमुक्त गाव अभियानाचा आज दि 24 रोजी आवरे येथे विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी,मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. प्लास्टिक मुक्त गाव अभियानाचा शुभारंभ आवरे येथे करण्यात आले त्याचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते,रोटरी क्लब ऑफ सनराइज पनवेलचे अध्यक्ष राजू मुंबईकर यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित प्रत्येक गावातील सामाजिक संघटना, व्यक्तिंना कापडी पिशवीचे वाटप करून सदर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातुन उरलेली रक्कम प्लास्टिक मुक्त गाव अभियानासाठी वापरण्यात आल्याचे नागेंद्र म्हात्रे यांनी सांगितले.
हेही वाचा :- काही निवडक छोट्या आणि वंचित शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता सरळ खात्यामध्ये ट्रान्सफर होणार
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना राजू मुंबईकरांनी प्लास्टिकमुक्त गाव अभियान प्रत्येक गावात राबविन्याचा व जास्तीत जास्त कापडी पिशवी वापरण्याचा सल्ला उपस्थितांना दिला. प्लास्टिकमुक्त गाव संकल्पनेसाठी उरण मधील विविध संस्थेनेही पुढाकार घेतला असुन यामध्ये सारडे विकास मंच यांच्यासह केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्वी, आम्ही पिरकोनकर समूह, गोल्डन ज्युबली सारडे, कोप्रोलि स्वच्छता अभियान, सह्याद्रि प्रतिष्ठान उरण, सुयश क्लासेस आवरे, कै. मधुकर ठाकुर प्रतिष्ठान आवरे, जाणता राजा ग्रुप वशेणी,साई इलेवन ग्रुप आवरे, मैत्री ग्रुप, CHA संघटना उरण,बापूजी देव सेवाभावी मंडळ कोप्रोलि आदि विविध सामाजिक संस्थानी पुढाकार घेतला आहे.यावेळी या सर्व सामाजिक संस्थाचे पदाधिकारी-कार्यकर्ते शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते.या सर्व सामाजिक संस्थानी प्लास्टिकमुक्त गाव करण्याचा संकल्प केला आहे. विविध सामाजिक संस्थाचा तसेच जनतेचाही या उपक्रमास अर्थातच या अभियानास उत्स्फूर्त मिळाला आहे. या अभियानामुळे पर्यावरणविषयी जनजागृती होण्यास खूप मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक कौशिक ठाकुर तर आभार प्रदर्शन सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी केले.