कृष्णा, पंचगंगेचे पूर नियंत्रण, प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.१७ :- कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुराची तीव्रता कमी व्हावी यासाठी जलसंपदा विभागाने कृष्णा, पंचगंगा नदी पात्रांतील गाळ काढण्यासाठी तसेच पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रीया तसेच अन्य उपाययोजनांबाबत तातडीने पावले उचलावीत अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा, योजना आणि प्रश्नांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या कामांसाठीचा नगरोत्थान योजनेतील १०० कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावा यासह इचलकरंजी महापालिकेच्या नवीन सभागृहासाठी आणि महापालिकेसाठी अंशदान तरतुदीबाबत ही कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाची’ हिरकणी’ बस लवकरच नव्या रंगरउपआत
बैठकीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, सहकार व पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कूमार, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर तसेच अन्य मंत्री, अधिकारी उपस्थित होते.
दर पावसाळ्यात पंचगंगा आणि कृष्णा नदीमुळे पूर परिस्थिती निर्माण होते. त्याबाबत बैठकीत चर्चा झाली. नदी पात्रातील गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाने एक धोरण निश्चित करावे. यातून नदी पात्राचे खोलीकरण, रुंदीकरण होईल तसेच प्रवाहाचा मार्गही मोकळा होईल. यासाठी जलसंपदा विभागाचा यांत्रिकी विभाग आणि जोडीला स्वयंस्फुर्तीने सहभाग देऊ इच्छिणाऱ्या खासगी यंत्र धारकांचाही सहभाग घ्यावा. कोल्हापूर महापालिकेचा पूर नियंत्रणाच्या उपाययोजनांच्या निधीबाबतही प्रस्ताव सादर करावा. दरडी कोसळणे, भुस्खलन याबाबत तज्ज्ञांच्या मदतीने अशा जोखमींच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात यावे., असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.