भोपर ते कोपर रेल्वे स्थानक २२ कोटींच्या रस्त्याला केंद्राची मंजुरी
डोंबिवली दि.११ – गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या भोपर ते कोपर रेल्वे स्थानक रस्त्यासाठी निधी देण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना अवघ्या १० मिनिटांत डोंबिवलीला जाता येणार आहे. दीड किलोमीटरच्या या रस्त्यासाठी सुमारे २२ कोटींचा खर्च अपेक्षित असून या अंतर्गत रेल्वे उड्डाणपुलाचाही समावेश आहे. केंद्रीय रस्ते निधीतून या रस्त्यासाठी मंजुरी मिळावी यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे पाठपुरावा करत होते.
गेल्या अनेक वर्षांपासून भोपर ते कोपर स्थानक रस्त्याची मागणी होत होती. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली असून रेल्वेवर उड्डाणपूल अथवा सबवे नसल्यामुळे लोकांना लांबचा वळसा पडतो. त्यामुळे रेल्वेवरील उड्डाणपुल, तसेच खाडीवरील छोट्या पुलासह हा रस्ता व्हावा, यासाठी खा. डॉ. शिंदे प्रयत्नशील होते. या रस्त्यासाठी ग्रामस्थ १९८५ पासून मागणी करत होते. या प्रकल्पासाठी सुमारे २२ कोटींचा खर्च अपेक्षित असल्यामुळे केंद्रीय रस्ते निधीतून या प्रकल्पाला मंजुरी मिळावी, यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची शुक्रवारी त्यांनी नवी दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना या रस्ते प्रकल्पासाठी निधी देण्याची विनंती केली. गडकरी यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला असून प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.